भाईंदर : मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात महानगरपालिकेकडून नुकत्याच तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गाचा वापर वाहनतळाकरिता करण्यात येत आहे. दरम्यान, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या पादचारी मार्गाचा असा वापर होत असल्याने कारवाईची मागणी होत आहे.

मीरा रोड पूर्व येथील रामदेव पार्क परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरिकांची लोकवस्ती आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या आरक्षण क्रमांक २४६ ही जागा खेळाचे मैदान म्हणून खुली करण्यात आली आहे. या मैदानाभोवती सेव्हन स्क्वेअर शाळा असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिकांची रहदारी या भागात असते. त्यामुळे या मैदानाच्या सुशोभीकरणासह मुख्य प्रवेशद्वारापासून शाळेपर्यंत महानगरपालिकेमार्फत पादचारी मार्गाची निर्मिती करण्यात आली होती.

परंतु या पादचारी मार्गावर चारचाकी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

दीड वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर डिंपल यांच्या नगरसेवक निधीतून पादचारी मार्गाला संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु लाखो रुपये खर्च झाल्यानंतरदेखील या पादचारी मार्गाचा वापर चारचाकी आणि दुचाकी  वाहनतळाकरिता करण्यात येत आहे.

रात्रीच्या सुमारास या वाहनांमध्ये वाढ होऊन मुख्य रस्तादेखील अरुंद पडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन हा पादचारी मार्ग नागरिकांकरिता मोकळा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

या भागात वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे प्रशासनाकडून जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता त्या भागात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग