14 October 2019

News Flash

पत्नीने घटस्फोटासाठी केली नवऱ्याची खोटी सही, प्रियकराबरोबर केले लग्न

घटस्फोटाच्या कागदपत्रांवर नवऱ्याची बनावट स्वाक्षरी करुन महिलेने प्रियकरासोबत लग्न केल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये समोर आली आहे.

घटस्फोटाच्या कागदपत्रांवर नवऱ्याची बनावट स्वाक्षरी करुन महिलेने प्रियकरासोबत लग्न केल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये समोर आली आहे. आरोपी महिलेचा पती यूएईमध्ये नोकरीला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. नवऱ्याची फसवणूक करुन प्रियकरासोबत लग्न करणारी ही महिला मुंब्रा येथे रहायला असून तिला नऊ वर्षांचा मुलगा आहे.

पतीने पोलिसात नोंदवलेल्या फसवणुकीच्या तक्रारीनंतर संबंधित महिलेचे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महिलेचा पती २००७ पासून यूएईमध्ये नोकरीला आहे. पती परदेशामध्ये असताना ती जुन्या प्रियकराच्या संपर्कात आली. दोघांचे पुन्हा सूत जुळले. पतीला तिला यूएईमधून नियमितपणे खर्चासाठी पैसा पाठवायचा. तिच्या सांगण्यावरुन पतीने रहाते घर विकले व मुंब्रा भागातच २३ लाख रुपयांना नवीन घर विकत घेतले. हे घर त्याने पत्नीच्या नावावर केले.

पती एकदा भारतामध्ये आलेला असताना त्याला पत्नीच्या वर्तणुकीमध्ये बदल जाणवला. ती सतत फोनवर असायची. जेव्हा त्याने याबद्दल विचारणा केली तेव्हा तिने आपण एका मैत्रिणीबरोबर बोलत आहोत असे सांगितले. २०१७ मध्ये पती पुन्हा भारतात परतला तेव्हा आरोपी पत्नीने त्याला भेटण्यास नकार दिला तसेच घरातही प्रवेश करु दिला नाही.

अखेरीस पतीला शिळफाटा रोडवर एक लॉजमध्ये रहावे लागले. बाहेरुन चौकशी केली असता महिलेने तिच्या नावावर असलेले घर ३२ लाख रुपयांना विकल्याचे समजले अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. नवरा पुन्हा दुबईला निघून गेला. यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा घरी परतल्यानंतर त्याला घटस्फोटाची कागदपत्र दाखवण्यात आली. ज्यावर नवऱ्याची बनावट सही होती. एप्रिल २०१७ ची तारीख त्या कागदपत्रांवर होती.

घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाली त्यावेळी नवरा दुबईमध्ये होता. त्यामुळे हे सरळसरळ फसवणुकीचे प्रकरण होते. पोलिसांनी पासपोर्ट आणि व्हिसाची कागदपत्रे तपासली. त्यावरुन हे फसवणुकीचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले. पत्नीवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून ती दोषी ठरली तर सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

First Published on May 15, 2019 4:25 pm

Web Title: for divorce woman forges husbands sign marries boyfriend