विल इंडिया चेंज फाऊंडेशन

जगात झपाटय़ाने प्रगती करणाऱ्या आपल्या देशाची उभारणी हे एकच लक्ष्य उराशी बाळगणारी संस्था आहे ‘विल इंडिया चेंज फाऊंडेशन’. ही संस्था म्हणजे एक सामाजिक चळवळ असून आपले लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण देशाला एकत्र करणे या दृष्टीने संस्था उपक्रम राबवत आहे.

विश्वदीप रॉय-चौधरी यांनी लिहिलेल्या ‘विल इंडिया चेंज, अ कंपल्सरी क्वेश्चन टु इंडिया’ या पुस्तकावर आधारित या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आजवर करण्यात आलेल्या संशोधनांपैकी एक संशोधन असलेले पुस्तक आहे. विश्वदीप रॉय-चौधरी यांनी पाच वर्षे संशोधन करून हे पुस्तक लिहिले असून जवळपास ७० हून अधिक सामाजिक संस्थांनी या पुस्तकाचा गौरव केला आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत आपला देश नेमका कुठे आहे याचा अभ्यास करून देशाला योग्य मार्गावर नेण्यासाठी वर्तमान स्थितीतील आणि भविष्यातील उपक्रमांची रूपरेषा नक्की करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. गेली अनेक वर्षे आपल्या सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या तळागाळातील आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व्यक्तींचा आवाज बनणे तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विज्ञान, राजकीय आणि सामाजिक व्यवस्था यावर संशोधन करणे हेही संस्थेने आपल्या उद्दिष्टांचा एक भाग बनवला आहे.

संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी १५० हून अधिक गुणवंतांचा निवाडा करणारे विश्वदीप रॉय-चौधरी हेच या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अर्थतज्ज्ञ आदर्श धवन संस्थेचे उपाध्यक्ष असून मुआ थाय या बॉक्सिंग क्रीडा प्रकारातले एकमेव भारतीय सुवर्णपदकविजेते आसामचे अभिजीत हे संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. संस्थेचे मुंबईतील इतर सदस्यही संस्थेसाठी कायम तत्पर असतात.

फाऊंडेशनच्या वतीने महिला आणि लहान मुलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे शिक्षण या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. संस्थेच्या सदस्या सुहासिनी साकीर यांचा या कामात पुढाकार असून त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. संस्थेने राबवलेल्या उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेला ‘आज ब्रश से सफाई की क्या’ हा उपक्रम. या उपक्रमात मीरा रोड, भाईंदर आणि वसई भागातील ६५ शाळांचे ११ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छ भारत या विषयावर या विद्यार्थ्यांची निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, तसेच संस्थेने या निमित्ताने एक स्वच्छता गीतही प्रसिद्ध केले. मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते हे गीत प्रकाशित करण्यात आले. भारतात पहिल्यांदाच असे स्वच्छता गीत तयार करण्यात आले आहे. ४० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी हे गीत एकाच वेळी आपापल्या शाळेत गायले हे या उपकमाचे वैशिष्टय़ होते. स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

याशिवाय स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून संस्थेच्या पुढाकाराने झोपडय़ांमधून राहणाऱ्या १० वंचित महिलांनी ३५ फूट लांबीचा झाडू तयार केला होता. गेल्या वर्षी भाईंदर पश्चिम येथील मॅक्सस मॉल परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. या महिलांना अवघ्या सव्वा तासात हा झाडू तयार करून एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आणि त्याची नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

पौष्टिक आहार आरोग्याचा आधार हा आणखी एक उपक्रम महिला आणि नवजात बालकांसाठी राबवण्यात येतो. गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळासाठी आवश्यक असलेला पौष्टिक आहार यावर मार्गदर्शन करणारा हा संस्थेकडून करण्यात येत असलेला पहिलाच उपक्रम आहे. याशिवाय मुलांसाठी लंगोट (बेबी डायपरिंग) या उपक्रमातही संस्थेने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. या वर्षी जून महिन्यात विरारच्या यश विद्यानिकेतन या शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांना स्वयंपाकाचे धडे देणारी स्वयंपाक कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेत १०० महिला सहभागी

झाल्या होत्या. याशिवाय महिलांचे मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य, योग शिबीर, मातृदिन साजरा करण्यासाठी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. याशिवाय संस्थेने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्ली येथे भरलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यात भारतातील पहिले हिंदी भाषेतील यात्रा आमंत्रण ही प्रवास पुस्तिका प्रकाशित केली आहे.