ऋषिकेश मुळे

राजीव गांधी महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता

ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे. २५ वर्षांनंतर सुरू होणाऱ्या पदव्युत्तर विभागाअंतर्गत पहिल्या टप्प्यात न्यायवैद्यक शास्त्राचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी सध्या अवघ्या तीन जागा उपलब्ध आहेत.

कळव्यातील ठाणे महापालिकेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय’ आणि त्याच्या जोडीलाच असणाऱ्या ‘राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’त आठवडय़ाला दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचारांसाठी येतात. ठाणे, भांडुप, दिवा, कळवा, कांजुरमार्ग, मुलुंड, मुंब्रा, नाहूर आणि विक्रोळी या भागांतील रुग्ण येथे उपचारांसाठी येतात. येथील वैद्यकीय शाखेत वर्षांला ६० विद्यार्थी शिक्षण घेऊन रुग्णालयात पदवीपूर्व रुग्णसेवा करतात.

गेली २५ वर्षे या महाविद्यालयात फक्त एमबीबीएसपर्यंतचेच शिक्षण देण्यात येत होते. पदव्युत्तर पदवीसाठी मुंबईत किंवा राज्यातील इतर जिल्ह्य़ांमध्ये जावे लागत असे. दोनच वर्षांपूर्वी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर नियुक्ती झालेल्या डॉ. संध्या खडसे यांनी शासनाकडे या संदर्भात योग्य तो पाठपुरावा करून ठाणे जिल्ह्य़ातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू व्हावा, अशी मागणी केली होती. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास दोन दिवसांपूर्वी शासनाने परवानगी दिली. अभ्यासक्रमाला नाशिकच्या ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’ने मान्यता दिली आहे. इच्छुकांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे, असे महाविद्यालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

जेव्हापासून महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाली आहे, तेव्हापासून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. वर्षभरापूर्वी शासनाकडे तसा अर्ज केला होता. अखेर न्यायवैद्यकशास्त्राचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

– डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, राजीव गांधी महाविद्यालय