गाव, पाडय़ांजवळील जंगलांचे रक्षण करणाऱ्यांसाठी सुविधा

गावाशेजारील वन विभागाचे जंगल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. या जंगलाचे संवर्धन करणे हे वन विभागाप्रमाणे स्वकर्तव्यही आहे, या विचारातून गाव, वाडय़ापाडय़ांजवळील जंगलांचे रक्षण करणाऱ्या, तिथे कोयते, कुऱ्हाड घेऊन न जाणाऱ्या, चराई बंदी करणाऱ्या गुणवान ग्रामस्थांना मुरबाड वन विभागाने येत्या पाच वर्षांत १५ हजार घरगुती गॅसच्या जोडण्या देण्याचा संकल्प सोडला आहे. अशा प्रकारे जंगलाचे रक्षण करणाऱ्या दोन हजार ६९० ग्रामस्थांना यापूर्वीच वन विभागाने मोफत गॅसजोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती वन विभागाच्या मुरबाड वनाधिकाऱ्यांनी दिली.

मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप घरगुती गॅस सिलिंडर पोहोचले नाहीत. गावांमधील बहुतांशी वर्ग शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्गातील असल्याने दर महिन्याला ६०० रुपये कोठून मोजायचे या विचारातून हा वर्ग गॅस सिलिंडर खरेदी करीत नाही. गावातील बहुतांशी घरांमध्ये चुली पेटतात. यासाठी लागणारे सरपण  गावाजवळील वन विभागाच्या जंगलातून तोडून आणून ते वर्षभर वापरण्याची पद्धत गावांत आहे. या सततच्या तोडकामामुळे जंगले नष्ट होत चालली आहेत. ग्रामस्थांना चुलीच्या बदल्यात इंधनाचे साधन म्हणून मोफत गॅस जोडण्या दिल्या तर ते गॅसवर स्वयंपाकाची कामे करतील. चुलीसाठी लागणाऱ्या सरपणासाठी ग्रामस्थ जंगलात झाडे तोडण्यासाठी जाणार नाहीत. असा विचार करून वन विभागाने ग्रामस्थांमध्ये जवळच्या जंगलाविषयी ग्रामस्थांमध्ये आपुलकी निर्माण करावी. झाडे, जंगलांचे महत्त्व पटवून देऊन जंगलांचे रक्षण वन विभागाबरोबर ग्रामस्थांनीही करावे, तसेच गॅसचा वापर करून स्वयंपाक करावा, या उद्देशातून २०२२ पर्यंत १५ हजार जणांना जोडण्या दिल्या जातील.