एकीकडे शहरांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असतानाच दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या मामा-भाचे डोंगरावर आता वन विभागाच्या जोडीला सामाजिक संस्थांनी प्राणी आणि पक्ष्यांना अविरत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी ठोस प्रयत्न सुरू केले आहेत.
येऊरच्या जंगलात पक्षी-प्राण्यांचा नियमित वावर असला तरी मामा-भाचे डोंगर पक्षी आणि बिबटय़ांसाठी नंदनवन समजले जाते. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचे नैसर्गिक स्रोत उपलब्ध असून पाणी पुरविण्याचे काम मामा-भाचे दर्गा ट्रस्टने सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी जंगलामध्ये विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या माध्यमातून जंगलातील पक्षी तसेच प्राण्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे.
मामा-भाचे डोंगरावर मस्तान दरबार नावाची टेकडी आहे. या टेकडीजवळच दगडाच्या कपारीत पाण्याचा एक नैसर्गिक झरा आहे. त्यामुळे या दगडांच्या कपारीत एक पाणवठा तयार झाला आहे. याच पाणवठय़ावर बिबटय़ासह अन्य वन्यजीव प्राणी तसेच पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. हा स्रोत टिकून रहावा म्हणून परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच गाळ काढण्याचे काम ट्रस्टमार्फत करण्यात येते. याशिवाय, मामा-भाचे डोंगराच्या टेकडीवर मोठी विहीर असून ती सुमारे १२० फूट खोल आहे. या विहिरीमध्येही पाण्याचा मोठा साठा आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठा तसेच विहिरीतील पाणी उचलून जंगलामध्ये विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये सोडण्यात येते. मात्र जंगलातील प्राणी-पक्ष्यांच्या तुलनेत पाणवठय़ांचा आकडा कमी असल्यामुळे कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ट्रस्टचे पदाधिकारी नूर मोहम्मद यांनी दिली.