तुंगारेश्वरमध्ये वनविभागाकडून तोडकाम; भाविकांचा ठिकठिकाणी रास्ता रोको

वसई : वसई पूर्वेतील तुंगारेश्वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या दिलेल्या आदेशानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून आश्रमाच्या तोडकामाला सुरुवात केली. या कारवाईमुळे भाविकांमध्ये तणावाचे वातावरण पसरले. त्यांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

कारवाई करण्यासाठीची देण्यात आलेली मुदत संपत आल्याने दोन दिवसांपासून वन  विभागाने हालचाली सुरू केल्या होत्या. कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बुधवारपासून सुमारे तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तुंगारेश्वर डोंगरानजीक तैनात करण्यात आला होता. गुरुवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने तोडकामाला सुरुवात केली आहे.

या आश्रमावर होणारी कारवाई थांबविण्यासाठी आश्रम संस्थेच्या वतीने नुकताच राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी याबाबत न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र सुनावणी झाली नसल्याने त्यावर अजूनही निर्णय झाला नाही. याबाबत २ सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मात्र याबाबत वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला ही विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडे कारवाई स्थगित करण्यात यावी असा कोणताही आदेश नसल्याने अखेर कारवाईची सुरवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या कारवाईनंतर विरार, मीरा-भाईंदरमधील राई, मोर्धा आणि मोरवा गावांतील अनेक भाविक रस्त्यावर उतरले. या कारवाईचा त्यांच्याकडून निषेध करण्यात आला. या कारवाईमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.