मानवी वस्तीत येणाऱ्या सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडणाऱ्या सर्पमित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र वन्यजीव संरक्षक विभागाकडे या सर्पमित्रांची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. सर्पमित्रांना शासनाकडून ओळखपत्र असावे, अशा स्वरूपाची योजना मध्यंतरी राज्य सरकारने आखली होती. मात्र या ओळखपत्रांविषयी वनविभागच अनभिज्ञ असून यामुळे नेमके सर्पमित्र कुणाला म्हणावे या विषयी नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. पुरेशा प्रशिक्षणाविणा स्वत:ला सर्पमित्र म्हणून घेणाऱ्या तरुणांकडून सापांचे अक्षरश: हाल होतात आणि याविषयी वन विभागाला थांगपत्ताही नाही, असे काही पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
मानवी वस्तीमध्ये येणाऱ्या सापांना पकडून जंगलामध्ये सोडण्यासाठी सर्पमित्रांची फौज ठाणे, डोंबिवली आणि कल्याण शहरामध्ये कार्यरत असून अत्यंत जोखमीच्या या कामामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर या तरुणांकडून केली जात नाही. इमारतीमध्ये, उद्यानांमध्ये, गटाराजवळ, वाढलेल्या गवतामध्ये आणि कधी कधी घरामध्ये शिरलेल्या सापांना पकडून जंगलात सुखरूप सोडण्याचा प्रयत्न सर्पमित्र करत असतात. मात्र, साप पकडण्यासाठी तसेच त्याला इजा होऊ न देता सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी वनविभागाने केलेल्या नियमांचे पालन या सर्पमित्रांकडून होताना दिसत नाही. काही अतिउत्साही सर्पमित्रांकडून योग्य प्रकारे हाताळण्यात न आल्याने सापांना इजा झाल्याच्या तर काही वेळा सर्पमित्रांनाच साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही प्रशिक्षित आणि तज्ज्ञ तरुणांनाच सर्पमित्र ओळखपत्र देण्याची राज्य सरकारची योजना ठाणे पट्टय़ात राबवण्यात आलेली नाही.
सापांची हाताळणी योग्य प्रकारे करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींनाच सर्पमित्र ओळखपत्र द्यावे, अशी योजना राज्य सरकारने २००८मध्ये सुरू केली. मात्र, ठाणे परिसरात या योजनेची अंमलबजावणी तर दूरच पण येथील सर्पमित्रांची साधी माहितीही वनविभागाकडे नाही. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी वनविभागाकडे सर्पमित्रांविषयीच्या माहितीची मागणी केली होती. मात्र वनविभागाकडे अशी कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या विषयी ठाण्यातील उप वनसंरक्षक किशोर ठाकरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळू शकला नाही.

सर्पमित्रांविषयीचे नियम
* वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमानुसार मानवी जीवाला व मालमत्तेला धोकादायक ठरू शकणाऱ्या ठरावीक सापांना पकडून वनक्षेत्रात मुक्त करण्याची परवानी सर्पमित्रांना देण्यात येते.
* सर्पमित्रांना विषारी व बिनविषारी सापांचे तसेच सापांच्या विविध प्रजातींचे सविस्तर ज्ञान असणे आवश्यक असून साप चावल्यास प्रथमोपचाराची माहिती असणेही गरजेचे आहे.
* पकडलेल्या सापांचे जाहीर प्रदर्शन केल्यास शिक्षेची तरतूद.
* पकडलेल्या सापांची माहिती पोलीस, वनसंरक्षक यांना ४८ तासांच्या आत देऊन अशा सापांना योग्य आधिवासात सोडून द्यावे.