वसईत ‘प्रवासी’ माकड अखेर जेरबंद

वसई तालुक्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले. तुंगारेश्वर अभयारण्यातून आलेल्या माकडाने दुचाकी, पालिकेची बस आणि एसटीने ‘प्रवास’ केला. विरार, फुलपाडा, पारोळ आणि शिरसाड परिसरात माकडाने नागरिकांना हैराण केले. या वेळी माकडाने करमणूकही झाली. मात्र अखेर वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी सापळा लावून त्याला माकडाला जेरबंद केले.

तुंगारेश्वर अभयारण्यातून पारोळ परिसरात हे माकड आले होते. अभयारण्य भागातील गावात ते फिरत असे तर बऱ्याचदा सकाळ-सायंकाळी हे माकड पारोळ नाक्यावर ही उभे निदर्शनास आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी हे माकड पारोळ येथून एसटीच्या वसई बसमध्ये चढून माणसाप्रमाणे प्रवास करत ते शिरसाड येथे उतरले. नंतर त्याच दिवशी विरारकडे जाणाऱ्या वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करून ते विरार येथे महापालिका मुख्यालयाजवळ पोहचले.

विरार येथे आल्यानंतर माकडाने येथील नागरिकांना हैराण केले होते. खाऊ देणाऱ्यांच्या जवळ जाणे. त्यांनी ते न दिल्यास त्यांचा पाठलाग करणे, परिसरातील वाटसरूंना हैराण करणे सुरूच होते. गुरुवारी रात्री दोन व्यक्तींनी या माकडाला खाऊ देऊन त्याला दुचाकीवरून बसवून नेले. या वेळी माकडाने दुचाकीवरून केलेला प्रवास पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. या प्रवासाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली होती.शुक्रवारी दुपारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर माकडाने उच्छाद मांडला होता. विरार गांधीचौक परिसरात राहणारे राजनाथ कश्यप संध्याकाळी दुकान बंद करून तरणतलावाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता माकडाने त्यांना हेरून पुढील अर्धा तास त्यांचा पाठलाग केला. मात्र त्यानंतर फुलपाडा येथील एका वृद्धाचा माकडाने चावा घेतला. त्यामुळे  काही काळ दहशत निर्माण झाली. शुक्रवारी रात्री त्याला पकडण्यात आले.