News Flash

अंधश्रद्धेच्या फेऱ्यातून २८८  कासवांची ‘घरवापसी’

 ठाणे, नवी मुंबई, मुंबई या शहरांत कासवांची बेकायदा विक्री होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

मुंबई, ठाणे शहरांत वनविभागाची विशेष मोहीम; डीएनए चाचणीतून माग काढून कर्नाटकला रवानगी

घरात कासव पाळणे, हे शुभलक्षण मानले जाते. याच अंधश्रद्धेपोटी बंदी असतानाही कासवांची खरेदी करण्याचे फॅड मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांत रूजू लागले आहे. त्यामुळे कासवांच्या तस्करीतही वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेऊन वनविभागाने छेडलेल्या मोहिमेअंतर्गत पाळीव प्राणीविक्रेत्यांच्या दुकानांतून तब्बल २८८ कासव ताब्यात घेतले आहेत. या कासवांची डीएनए तपासणी केली असता, त्यांचा मूळ अधिवास कर्नाटक असल्याचे उघड झाल्याने वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल या संस्थेच्या मदतीने या मुक्या जिवांना कर्नाटकमध्ये धाडण्यात आले आहे.

ठाणे, नवी मुंबई, मुंबई या शहरांत कासवांची बेकायदा विक्री होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. कासव पाळणे, हा कायदेशीर गुन्हा असतानाही अनेकजण अंधश्रद्धेपोटी पेट दुकानांतून बेकायदा विक्री केले जाणारे कासव खरेदी करतात. ग्राहकांची मागणी वाढल्याने कासवांची तस्करी होण्याचे प्रकारही वाढीस लागलेले आहेत. या पाश्र्वभूमीवर वनविभागाने कासवांच्या ‘घरवापसी’ची मोहीम हाती घेतली आहे. विविध पर्यावरण संस्था, वनविभागाचे अधिकारी आणि वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम सुरू करण्यात आली असून अवैधरित्या कासवांची वाहतूक करणाऱ्यांकडून तसेच पाळीव प्राण्यांच्या दुकानांची पाहणी करून कासव जप्त करण्यात येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सापडलेल्या ‘स्टार टॉरटॉईज’ या प्रजातीच्या २८८ कासवांना नुकतेच कर्नाटक राज्यात पाठवण्यात आले.

शास्त्रीय पद्धतीने घरवापसी

* वनविभागाच्या मोहिमेतून ताब्यात घेण्यात आलेले कासव महाराष्ट्रातील नसल्याचे उघड झाले. त्यानंतर या कासवांची डीएनए तपासणी करण्यात आली व त्याआधारे त्यांचा मूळ अधिवास शोधण्यात आला. २०१५ मध्ये वनविभागाच्या वतीने अशाच प्रकारे महाराष्ट्रात जप्त केलेल्या कासवांना उत्तरप्रदेशातील ब्रम्हपुत्रा येथे पाठविण्याची मोहीम राबवण्यात आली होती.

* डीएनए तपासणीतून मूळ अधिवासाचा उलगडा झाल्यानंतर ठाणे वनविभागाच्या वतीने संबंधित राज्याच्या वनविभागाशी संपर्क साधून या कासवांना रेल्वे, विमान अथवा वाहनांनी मूळ गावी पाठवण्यात येते.

* अनेक काळ ज्या वातावरणात कासव वाढले आहेत, त्या वातावरणाची, खाद्यपदार्थाची कासवांना सवय झालेली असते. त्यामुळे घरवापसी केल्यावर त्वरित कासवांना जंगलात न सोडता काही काळ संबंधित राज्याच्या वनविभागाच्या देखरेखेखाली ठेवण्यात येते.

* वनविभागाच्या देखरेखेखाली असेपर्यंत हळूहळू कासवांना जंगलातील खाद्यपदार्थ खाण्याची सवय लावण्यात येते. कालांतराने ही कासवे मूळ राज्याच्या वातावरणाशी एकरुप झाल्यावर त्यांना जंगलात सोडण्यात येते, असे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी सांगितले.

कासवांची मोठय़ा प्रमाणात होणारी तस्करी थांबवण्यासाठी ठाणे वन विभागाच्या वतीने कासवांच्या घरवापसीचा हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. मोठमोठय़ा रेस्टॉरंटमध्ये किंवा परदेशात पाठवण्यासाठी स्टार टॉरटॉईज जातीच्या कासवांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. मात्र या कासवांचे मूळ महाराष्ट्रातील नसते. या कासवांना मूळ राज्यात पाठवण्यासाठी काही पर्यावरण संस्था, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल संस्था यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू आहे.

– डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे वन विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 3:38 am

Web Title: forest department recover 288 turtles from pet shops in thane
Next Stories
1 दिघे स्थानकाच्या उभारणीसाठी पुन्हा निविदा
2 मुंब्य्रातील फलाटांतील पोकळी घटणार
3 शहरबात ; ‘गोंधळी’ लोकप्रतिनिधी
Just Now!
X