वसईजवळच्या जंगलात तस्करांनी वनविभागाच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तुंगारेश्वर अभयारण्यात मोठय़ा प्रमाणावर सागाच्या लाकडांची तस्करी होत होती. शुक्रवारी रात्री वनअधिकारी वसईच्या सातिवलीनजीकच्या जंगलात गस्त घालत असताना जनसाई गावाजवळ एक टेम्पो संशयास्पद अवस्थेत दिसला. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जीपने पाठलाग करून टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला. टेम्पोत किमान दहा ते पंधरा तस्कर होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळच्या सकवार येथील निर्जन भागात तस्करांनी वनखात्याच्या जीपवर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात वनअधिकारी बी. एस. दळवी गंभीर जखमी झाले.