अंबरनाथ येथील मांगरुळ येथे शिवसेनेने लावलेल्या झाडांकडे वन विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काही समाजकंटकांनी झाडांना आग लावल्याचा आरोप शिवसेनेने केला तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यासमोर काही शिवसैनिकांनी वनाधिकाऱ्यांच्या तोंडाला राख फासली. याच घटनेचा निषेध आज ठाण्यात करण्यात आला. ठाणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. याबाबत पोलिसांनी राजकीय दबावामुळे कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही असा आरोप महाराष्ट्र राज्य फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्ट युनियन तर्फे करण्यात आला.

राजेंद्र कदम यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला हा प्रशासनावरचा हल्ला आहे. या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनोधैर्य खचले आहे. काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. या हल्ल्याबाबत पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी गांभिर्याने लक्ष घालून दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच आंदोलनही करण्यात आले. एवढेच नाही तर २ डिसेंबर पर्यंत दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर कामबंद आंदोलन करू असाही इशारा देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातल्या दोषींविऱोदात कलम ३५३ लागू करा असेही या पत्रात म्हटले गेले आहे.