News Flash

शहरीकरणाच्या रेटय़ात रानभाज्यांचा ऱ्हास

गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी; अनेक चविष्ट भाज्या दुर्मीळ

|| किन्नरी जाधव

गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी; अनेक चविष्ट भाज्या दुर्मीळ

मेथीपेक्षाही कडू तरीही चविष्ट असलेली टाकळा, बियांची चटणी करून खाता येणारी कुरडू, रक्तातील साखर नियंत्रित करणारी करटोली आणि अशाच प्रकारच्या बाफली, दिंडा, आंबटवेल, कवली, देसा, भाने, जारस या रानभाज्या. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की ग्रामीण डोंगराळ भागातून येणाऱ्या या रानभाज्या खवय्यांना खुणावू लागतात. केवळ चवीमुळेच नव्हे तर, विविध गुणकारी उपयोगांमुळेही प्रसिद्ध असलेल्या रानभाज्या खरेदीसाठी या काळात बाजारात गर्दी झाल्याचे चित्र दरवर्षीच दिसते. पण येत्या काही वर्षांत हे चित्रच नाहीसे होईल, अशी भीती आहे. वाढते शहरीकरण, वनजमिनींवरील अतिक्रमणे, बदलते हवामान अशा अनेक कारणांमुळे पावसाळय़ात मिळणाऱ्या रानभाज्यांचा आता ऱ्हास होऊ लागला आहे.

पहिला पाऊस झाल्यावर आदिवासी पाडय़ातून महिला शहरातील बाजारपेठेत रानभाज्या विकण्यासाठी येत असतात. गावदेवी, जांभळीनाका परिसरातील बाजारात रस्त्याच्या दुतर्फा रानभाज्या विकणाऱ्या महिलांची गर्दी होत असते. जून महिन्यापासून सुरू झालेला हा रानभाज्यांचा बाजार ऑक्टोबर महिन्यापर्यंत असतो. मात्र गेल्या काही वर्षांत रानभाज्यांची आवक कमी झाल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. पूर्वी पावसाळय़ात कुठेही दिसणाऱ्या रानभाज्या आता दाट जंगलातून शोधून आणाव्या लागत असल्याने त्यांच्या किमतीही वाढत आहेत. आवक कमी असल्याने या दरांत आणखी वाढ होते, असे भाजीविक्रेते सांगतात. पाच ते सहा वर्षांपूर्वी शेकटाचा पाला, कोरला, सरमळ, टाकळा, रानमाठ, बाफली, दिंडा, आंबटवेल, कवली, देसा, भाने, जारस, घोळ, कुरडू, इकरा, कोडशी या हिरव्या पालेभाज्या, करंद, कोनफळ, बांबू कोंब, केळ कोंब, जंगली सुरण, शेंदवळ, डांगर, कुडा, टेटू, काकड, करटोलीसारखी कंदमुळे, फळे, शेवळे, गाभोळीसारखी फुले या भाज्या मुबलक प्रमाणात मिळत होत्या. मात्र सध्या बाजारात मिळणाऱ्या रानभाज्यांच्या जातींमध्ये या भाज्या खूप तुरळक प्रमाणात मिळतात, असे वृक्षप्रजातींवर संशोधन केलेल्या प्रा. डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले. पूर्वी या भाज्या आदिवासी पाडय़ांलगतच उपलब्ध होत होत्या. मात्र येऊरच्या जंगलात सतत लावण्यात येणारे वणवे, वृक्षतोड याचा मोठा फटका रानभाज्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर होत असल्याने या भाज्यांची उपलब्धता कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी टाकळा, खारी भाजी, सायलेट, लाल मुळा या भाज्यांचा वाटा २ रुपयांना विकायचो, आता या भाज्या जंगलात मिळतच नाही. कधीतरी टाकळा, लाल मुळा, शेवळ्या उपलब्ध होतात. मात्र घनदाट जंगलात जाऊन या भाज्या आणाव्या लागत असल्याने सध्या या भाज्यांच्या किमती जास्त आहेत, असे जांभळीनाका परिसरातील रानभाजी विक्रेते राजाराम ठिकरूळ यांनी सांगितले. पूर्वी शेवळ्या १०० रुपयांना दहा जुडय़ा विकल्या जात होत्या. सध्या बाजारात १०० रुपयांना चार लहान जुडय़ा विकण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

वेळेपूर्वीच भाज्या खुडण्यामुळे वाढ कमी

पावसाळा सुरू झाल्यावर शहरात रानभाज्यांची मागणी वाढते. रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत, असाही समज आहे. त्यामुळे पहिला पाऊस झाल्यावर त्वरित शेवळी या कंदभाजीची जमिनीबाहेर आलेली फुले खुडून टाकतात. त्यामुळे या भाजीची वाढ थांबते. भाजीची पूर्ण वाढ होऊ न देता भाजी खुंटल्यामुळे त्याची निर्मिती क्षमता कमी होते, असे वृक्ष अभ्यासिका सीमा हर्डीकर यांनी सांगितले.

पूर्वी भाज्या विकण्यासाठी दाट जंगलात जावे लागत नव्हते. मात्र आता दाट जंगलात गेल्यावरही या भाज्या फार कमी प्रमाणात मिळत असल्याने रानभाज्या जास्त किमतीत विकाव्या लागतात.  – साधना गुरव, भाजीविक्रेत्या, येऊर

कोनफळ, बांबूचे कोंबांचा ऱ्हास

पूर्वी पावसाळ्यात कोनफळ हे फळ जंगलात मिळायचे. चवीला गोड असल्याने या फळाला बाजारात मागणी असायची. मात्र  गेल्या काही वर्षांत कोनफळ मिळत नाही. बांबूच्या कोंबाची भाजी चवीला उत्तम असते. सध्या बांबूचे कोंबही मिळत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:20 am

Web Title: forest vegetables
Next Stories
1 गर्भवतीची ठाण्यापर्यंत फरफट
2 चिखलोलीचे मारेकरी कोण?
3 कचरा विल्हेवाटीचा विडा!
Just Now!
X