‘लोकसत्ता’मधील वृत्तानंतर वन विभागाची पावले
हमालयाच्या पर्वतरांगांमधून येऊरच्या जंगलात वास्तव्यास येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची शिकार होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांमध्ये पक्षी संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन याविषयी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य जीवांच्या शिकारी संबंधीची माहिती तात्काळ कळावी यासाठी वन विभागाने येऊर गावातील आठ स्थानिकांची शिकार प्रतिबंधक समिती नेमली आहे. या समितीने पाहुणे पक्षीच नव्हे, तर इतर शिकारींसंबंधीच्या तक्रारी तातडीने वन विभागाला कळवाव्यात असे काम सोपविण्यात आले आहे.
‘राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वन्य जीवांची हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या पक्ष्यांची शिकार करताना कुणीही आढळल्यास त्यासंबंधी माहिती देण्यात यावी,’ असे आवाहन वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांना केले आहे. हिमालयातून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांना पर्यावरण तसेच पक्षीप्रेमींच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.
येऊरच्या जंगलात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची शिकार केली जात असल्याच्या तक्रारी काही पक्षीप्रेमी संस्थांकडून पुढे येताच त्यासंबंधीचे सविस्तर वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. सुरुवातीला अशी शिकार होत असल्याचा इन्कार करणाऱ्या वन विभागाने वृत्त प्रसिद्ध होताच येऊरच्या जंगलांमध्ये विशेष शोध मोहीम हाती घेतली असून स्थानिक ग्रामस्थांना मार्गदर्शन करणे, पक्षीप्रेमींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे यांसारखे कार्यक्रम तातडीने हाती घेण्यात आले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे साहाय्यक वनसंरक्षक उदय ढगे आणि परिक्षेत्र वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी नुकतीच येऊर गावातील आदिवासी ग्रामस्थांनी संवाद साधला. यावेळी या ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वन विभागातर्फे जंगलात गस्त घालण्यासाठी कर्मचाऱ्यांचा गट तयार करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक जनजागृती करण्यासाठी मुंबई राष्ट्रीय इतिहास सोसायटीचे तज्ज्ञ तसेच नॅशनल एन्वायर्मेटल वॉच संस्थेचे संयोजक रोहित जोशी यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले.
ग्रामस्थांमध्ये जनजागृती
भारतीय वन्यजीव कायदा १९७२ च्या तरतुदीनुसार राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वन्यजीवांची हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी माहिती देणाऱ्या परिपत्रकाचे वनविभागातर्फे ग्रामस्थांमध्ये वाटप सुरू करण्यात आले आहे. या परिपत्रकात राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी वन गुन्हा करण्यास प्रतिबंध करणे, कोणताही वन्यजीव मृत आढळल्यास वन विभागास तात्काळ कळवणे तसेच वन विभागाचे अधिकारी वन्य जीवाला ताब्यात घेईपर्यंत त्याची देखभाल करणे, राष्ट्रीय अभयारण्यात शस्त्र नेण्यास बंदी अशा बाबींची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही पर्यटक अथवा स्थानिक रहिवासी वन्य जीवांची, पक्ष्यांची हत्या करताना आढळल्यास वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागातर्फे ग्रामस्थांमध्ये करण्यात येत आहे.