26 October 2020

News Flash

सागर देशपांडे यांची आत्महत्या?

पोलिसांचा प्राथमिक अंदाज

सागर देशपांडे

पोलिसांचा प्राथमिक अंदाज

कल्याण/मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज’ या आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीचे सनदी लेखापाल सागर देशपांडे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज कल्याण लोहमार्ग पोलिसांनी वर्तविला आहे.

‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज’मध्ये सनदी लेखापाल म्हणून कार्यरत असलेले सागर देशपांडे (३८) ठाणे येथील चरई भागात वडील आणि बहिणीसोबत राहात होते. या   घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्य़ात सागर हे आरोपी नव्हते. मात्र, त्यांची चौकशी झाली होती. या गुन्ह्य़ाबाबतची कागदपत्रे पोलिसांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते, अशी माहिती मुंबई पोलीस सूत्रांनी दिली.

११ ऑक्टोबरला ते टिटवाळा येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १२ ऑक्टोबरला कल्याण लोहमार्ग पोलिसांना टिटवाळा रेल्वे रुळाजवळ  एक मृतदेह आढळून आला. तो  सागर यांचा असल्याचे शनिवारी उघडकीस आले. शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघात स्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांचे वाहन सापडले आहे. मृतदेहाची ओळख पटवून एकच दिवस झाला आहे. आताच अंतिम निष्कर्षांप्रत येणे योग्य नाही. त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या बोलण्यातून काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे वाटत आहे, असे कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात काही घातपात असल्याबाबतची माहिती अद्याप आमच्याकडे नाही. परंतु  धागेदोरे मिळाले तर त्या दिशेने तपास करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सागर यांच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या.

‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग’ कर्जबुडित प्रकरणात साक्षीदार..

कोटक महिंद्रा बँकेच्या तक्रारीवरून ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग’ (सीकेएल) कंपनीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्य़ात सागर देशपांडे हे साक्षीदार होते, अशी माहिती मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी कोटक महिंद्रा बँकेने ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग’ कंपनीविरोधात १७६ कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आले. तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने ‘सीकेएल’ विरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी ‘सीकेएल’चे माजी व्यवस्थापक (वित्त) आणि सनदी लेखापाल सागर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांना या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. ही कागदपत्रे तपासाच्या पुढल्या टप्प्यावर, आवश्यकतेनुसार सागर यांच्याकडून ताब्यात घेतली जाणार होती, त्यासाठी त्यांना मुदत वगैरे देण्यात आली नव्हती, असे  संबंधित  अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दरम्यान, ‘सीकेएल’चे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर यांनी न्यायालयात दोन खासगी तक्रारी दाखल करून या घोटाळ्यामागे आपल्याच कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि बँका सहभागी आहेत, असा आरोप केला होता.

शनिवारी सागर देशपांडे यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज आहे. तरीही विविध अंगाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पहिल्या दोन दिवसांत तपासातून अंतिम निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.

-ए. सी. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग पोलीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 1:34 am

Web Title: former accountant manager of cox kings sagar deshpande commits suicide zws 70
Next Stories
1 ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या बेपत्ता फायनान्स अधिकाऱ्याचा रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह
2 बेपत्ता सनदी लेखापालाचा मृतदेह आढळला
3 सुंदर मी दिसणार!
Just Now!
X