अंबरनाथ : निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत वाढत असलेला घोळ आता मतदारांच्या जीवावर उठत असल्याचे दिसून आले आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने प्रभागातील दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव आणि त्यांचा मुलगा अजय यादव या दोघांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासकीय पातळीवर जोमाने सुरू आहे. नुकत्याच अंबरनाथ नगरपालिकेतर्फे प्रारूप याद्या तयार झाल्या होत्या. या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप याद्या जाहीर होताच झाला. त्यामुळे प्रभागांमध्येही संतापाचे वातावरण होते. अनेक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात फेकली गेल्यानेही अनेक इच्छुक उमेदवार नाराज होते. त्यातच दुसऱ्या प्रभागातून राहत असलेल्या प्रभागात नाव स्थलांतरित करण्याच्या कारणावरून काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी प्रभागातील लक्ष्मण यादव आणि बिरई यादव या दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुरेंद्र यादव आणि त्यांची मुले अजय आणि विजय या दोघांनी लक्ष्मण आणि त्यांचे वडील बिरई यादव यांना बुधवारी दुपारी बुवापाडा येथे बेदम मारहाण केली. तुम्ही मला मतदान करत नाहीत, म्हणून तुमची नावे दुसऱ्या प्रभागात राहतील असे सांगत हा हल्ला केल्याचा आरोप जखमी यादव पितापुत्रांनी केला आहे. आपण प्रभाग क्रमांक ८ मध्ये राहत असून आमची नावे प्रभाग क्रमांक ९ मध्ये आली आहेत, अशा प्रकारची माहिती देण्यासाठी लक्ष्मण यादव यांनी पालिकेत संपर्क साधला होता.  त्यानंतर हल्ला झाला.