राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे संकेत त्यांनी स्वतःच दिले आहेत. “वयाची 69 वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो,” असं सूचक वक्तव्य गणेश नाईक यांनी काल(दि.25) नवी मुंबईतील आयोजित सायक्लोथॉनच्या वेळी केलं. या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्याच्या राजकारणात विविध चर्चा रंगत आहेत.

स्वच्छ पर्यावरण पूरक आणि आरोग्यमय मुंबईचा संदेश देण्यासाठी रविवारी नवी मुंबई महासायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेश नाईक यांनी या सायक्लोथॉनचं आयोजन केलं होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या वयातही आपण ठाण्यापर्यंत जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, ठाण्यातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही ठाण्यातून गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र नाईक कुटूंबियांकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. पण, आता नाईकांच्या या सूचक वक्तव्यानंतर स्वतः गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.