१४ फेब्रुवारीला शहरातील सर्व कॉलेजकट्टय़ांवर आणि तरुणाईमध्ये सोबत सोशल मीडियावर व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करणार आहेत. शहरातील इतर सगळ्या कार्यक्रमांत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा साजरा होणारा हा कृतज्ञता सोहळा या आठवडय़ात नक्कीच लक्षवेधी ठरावा असा आहे.
ज्ञानसाधना महाविद्यालय आज ठाण्यात नावारूपाला आले आहे. ठाणे महापालिकेच्या भाडय़ाच्या वास्तूमध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाची आज मोठी वास्तू उभी राहिली, पण ज्या समाजघटकातील मुलांसाठी हे महाविद्यालय सुरू झाले त्या समाजघटकाशी या महाविद्यालयाची नाळ आजही जोडलेली आहे. आणि हेच खरे त्याचे वैभव आहे. जुन्या ठाण्यात मध्यम आणि त्या खालच्या आर्थिक वर्गातील अनेक कुटुंबं कामगार वस्ती असणाऱ्या किसन नगर, लोकमान्य नगर, शिवाई नगर, खोपट, वागळे इस्टेटच्या भागात वास्तव्यास आली. अशा कामगार आणि मध्यमवर्गीय मुलांना प्रवेश देऊन ज्ञानसाधना महाविद्यालयाने काम सुरू केले. त्यामुळे स्वाभाविकपणे या महाविद्यालयाशी हे विद्यार्थी एका स्नेहाने जोडले गेले. या महाविद्यालयाशी स्वतंत्र सेनानी दत्ताजी ताम्हणे, जनकवी पी. सावळाराम, स. वि. कुलकर्णी, नाटककार श्याम फडके, इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी, कवी अशोक बागवे, प्रवीण दवणे, प्रज्ञा दया पवार अशी मोठी नावे जोडलेली आहेत. या सगळ्यांच्याच सहवासात अनेक विद्यार्थी घडले, ते पुढे ठाणे शहरात विविध क्षेत्रांत काम करत आहेत. आज हे विद्यार्थी उद्योग व्यवसायासह राजकारणातही स्थिरावले आहेत. ठाण्याचे महापौर संजय भाऊराव मोरे आणि स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के हे दोघेही या महाविद्यालयाचे विद्यार्थी असून अनेक नगरसेवकही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून १४ फेब्रुवारीला प्रा. बाळासाहेब खोल्लम आणि प्रा. भारती जोशी यांचा कृतज्ञसोहळा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे.
या महाविद्यालयाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे शहरातील सामाजिक, साहित्यिक उपक्रमांशी जोडले गेलेले या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट ठाण्यातील महापौर मॅरेथॉन, गणपती विसर्जन, पल्सपोलिओ अभियान, साक्षरता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर अशा विविध अभियानांत या महाविद्यालयाचे विद्यार्थी गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीशी जोडून तरुण वयात सामाजिक जाणिवेचा संस्कार करण्याचे काम या महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे. म्हणूनच आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी विद्यार्थी एकत्र आले असून या राष्ट्रीय सेवा योजनेत अनेक वर्षे नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या या दोन शिक्षकांचा हे विद्यार्थी सत्कार करणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महापौर आणि स्थायी समिती सभापती या दोघांच्या हस्ते या शिक्षकांचा सन्मान होणार असून एकीकडे तरुणाईची व्हॅलेंटाइन डेची धूम सुरू असताना त्याच दिवशी या शहरात हा सोहळा रंगणार आहे.
मुंबई विद्यापीठाकडे राष्ट्रीय सेवा योजनेची एक मोठी ताकद असून, या विद्यार्थ्यांच्या सहभागातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. एरवी फारसे प्रसिद्धीस न येणाऱ्या या उपक्रमातून अनेक समाजोपयोगी कामे केली जात आहेत. एखादे गाव दत्तक घेऊन त्यासाठी काम करण्याची पद्धत या युनिटकडे गेली अनेक वर्षे आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयानेही शहापूर तालुक्यातील शिरोळ हे आदिवासी गाव असेच दत्तक घेतले होते. तिथे पाण्याच्या बंधाऱ्यासह अनेक उपक्रम राबवण्यात आले. एकीकडे कॉलेजमध्ये त्रुणाईची असणारी सळसळ, उत्साह, जोश वेगवेगळे डे साजरे करण्याची पद्धत, कॉलेज कट्टा, कॉलेज कँन्टीन अशा तरुणाईच्या आवडीच्या जागा आणि त्यासोबतच समाजातील समकालीन वास्तवाचे भान देणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते. अशा या सगळ्या संस्कारात वाढलेल्या विद्यार्थ्यांचे आज मागे वळून पाहताना नेमके अनुभव काय आहेत. कॉलेजच्या चार भिंतींपलीकडे जाऊन कॉलेजने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नेमके काय शिकवले याचा ऊहापोह यानिमित्ताने या माजी विद्यर्थ्यांच्या अनुभवकथनातून होणार आहे, त्यानिमित्ताने ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक एकत्र येणार आहेत. म्हणूनच हा कार्यक्रम या आठवडय़ात लक्षवेधी ठरावा असाच आहे.