21 October 2019

News Flash

माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला घराची भेट

गुरुजींप्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या गावी त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

| September 5, 2015 08:43 am

आगळीवेगळी गुरुदक्षिणा..
काळानुरूप गुरूशिष्य परंपरा अस्तंगत होत असल्याची ओरड होत असली तरी आपल्या शैक्षणिक जीवनाची जडणघडण करणाऱ्या शाळा, महाविद्यालये, शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. मात्र, डोंबिवलीजवळील सोनारपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ३२ वर्षे अध्यापनाचे काम करणारे विठ्ठल भिमाजी शिंदे या शिक्षकाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे आठ लाख रुपये खर्चून या शिक्षकाला त्यांच्या गावी घर बांधून देण्यात असून त्यासाठी निधीही गोळा करण्यात आला आहे.नवी मुंबईतील घणसोली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत साठच्या दशकात इंग्रजीचे शिक्षक म्हणून शिंदे यांची नेमणूक झाली. त्यानंतर दोनच वर्षांत, १९६७मध्ये त्यांची बदली डोंबिवलीजवळील सोनारपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. या शाळेत रुजू झाल्यानंतर शिंदेगुरुजींनी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर अवघ्या सोनारपाडय़ालाही लळा लावला. त्यामुळे तब्बल ३२ वर्षे सोनारपाडावासीयांनी गुरुजींची कुठेही बदली होऊ दिली नाही. १९९९ मध्ये शिंदेगुरुजी या शाळेतूनच निवृत्त झाले. तेव्हा सोनारपाडावासीयांनी डोंबिवली शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढली. त्यांच्या सन्मानार्थ ३२ हजार रुपयांचा निधी आणि भेटवस्तू दिल्या. आता निवृत्तीनंतरही विठ्ठल शिंदेगुरुजी गणेश विद्यामंदिर या डोंबिवलीतील त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेत दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत शिकवितात. दुपारी ते शिक्षण मंडळ कार्यालयात शिक्षकांना मदत करतात.  शिंदेगुरुजींवरील सोनारपाडावासीयांचे प्रेम अजूनही ओसरलेले नाही. म्हणूनच अलीकडेच ७४ व्या वर्षी सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी गुरुजींप्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या गावी त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील करंडी या त्यांच्या गावी एक हजार चौरस फुटांचे घर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च येणार असून विद्यार्थ्यांनीच हा निधी आपापसातून वर्गणी काढून उभा केला आहे. गेल्या महिन्यापासून या घराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे.

केवळ शाळाच नव्हे तर संपूर्ण गावावर शिंदे गुरुजींचा प्रभाव आहे.  निवृत्तीनंतरही त्यांचा संपर्क कायम आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून आम्ही त्यांच्या गावी त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. इतके वर्षे शिक्षणक्षेत्रात कार्य करत असताना गुरुजींनी स्वत:साठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे आम्हा विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे.

-मुकेश पाटील, माजी सरपंच, सोनारपाडा

 

First Published on September 5, 2015 3:03 am

Web Title: former students gift the house to teacher
टॅग Teachers Day