वैतरणा ते डहाणू

पालघर जिल्ह्य़ातील विरारपलीकडच्या उपनगरीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये नव्याने शौचालयाची उभारणीच झालेली नसून असलेल्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. योग्य देखभाल न केल्याने अनेक वापरण्याच्या स्थितीत नाहीत. ‘राइट टू पी’ची चळवळ सर्वत्र जोर धरू लागत असताना रेल्वे व्यवस्थापनाचे या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष नसल्याने रेल्वे फलाटांवर दुर्गंधीचे वातावरण पसरले असून महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.

१६ एप्रिल २०१३ पासून विरार ते डहाणू रोडदरम्यान पहिली उपनगरीय गाडी धावली आणि १९९५ साली घोषित झालेल्या उपनगरीय सेवेचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी आणि बोईसर या भागांत झपाटय़ाने विकास झाला आणि नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. यामुळे नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणानिमित्ताने दैनंदिन प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढली. त्याचबरोबर या भागातील वाढते औद्योगिकीकरण, परिसर विकास व पर्यटनामुळे इतर प्रवाशांची संख्यादेखील वाढत गेली. मात्र  रेल्वे स्थानकावरील शौचालये व मुतारींची संख्या तितकीच राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

अस्वच्छता हा या भागतील रेल्वे स्थानकांवरील सर्व स्वच्छतागृहांचा समान दुवा आहे. त्यापैकी एखादा अपवाद वगळला तर अनेक शौचालये फार जुनी असून त्यांची डागडुजी किंवा नूतनीकरण झालेले नाही. यापैकी काही ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने त्यांचा वापर होत नाही. मुतारीची दुर्गंधी सर्वत्र पसरताना दिसते.

विरार ते डहाणू रोडदरम्यान चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने अस्तित्वात असलेल्या रेल्वे स्थानकांच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता पाहता नवीन शौचालय बनविण्याचे काम तूर्त बंद आहे. त्यामुळे शौचालयांची संख्या अपुरी असून त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शौचालयांची व मुतारीची स्वच्छता राखण्यासाठी खासगी ठेकेदाराला कामे सोपविण्यात आली नसून एकाच फलाटावर शौचालय असल्याने इतर फलाटांवर उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. शौचालयांच्या टाक्यांमधून ओसंडून वाहणारा मैला, परिसरात वाढलेली झाडेझुडपे हेदेखील अनेक ठिकाणी चित्र आहे.

शौचालयांच्या अस्वच्छतेबरोबरीने रेल्वे स्थानक व परिसरातही स्वच्छता ठेवली न जाणे हादेखील या भागातील महत्त्वाचा मुद्दा आहे. येथे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी उपनगरीय कर दिल्यानंतरही त्यांना रेल्वे प्रशासनाच्या अशा कारभारामुळे उपेक्षितच राहावे लागत आहे. वैतरणा ते डहाणू रोड स्थानकांदरम्यान वैतरणा व उमरोळी स्थानकांत शौचालय कार्यरत नाहीत, तर इतर स्थानकांत ती असली तरी प्रवाशांच्या संख्येच्या मानाने त्यांची संख्या अपुरीच आहेत.

२०१५ च्या उपलब्ध माहितीनुसार

  • वैतरणा स्थानकातून दररोज २ हजार ५९५ दैनंदिन प्रवासी प्रवास करीत होते. त्यापासून रेल्वेला महिन्याला ३६ लाख ६७ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाल्यानंतरही येथील शौचालयाची दयनीय अवस्था आहे. हे शौचालय अस्वच्छ असल्यामुळे प्रवासी येथे जाणे टाळत आहेत.
  • सफाळे रेल्वे स्थानकातून दररोज २१ हजार २७१ प्रवासी प्रवास करतात. त्यापासून महिन्याला ३५ लाख ५१ हजार ७३० रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. मात्र येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. यामुळे स्थानक परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. कित्येक दिवस त्याची सफाईच होत नाही.
  • केळवे रेल्वे स्थाकातून दररोज ५ हजार ७१२ प्रवासी प्रवास करतात. त्यांचे मासिक उत्पन्न रेल्वेला १० लाख ६० हजार ५०० इतके व या स्थानकावरील प्रवाशांकडून उपनगरीय कर वसूल केला जात असला तरी सुविधांचा अभाव आहे. शौचालय १९९३ ला बांधले गेले आहे. आजही त्याचाच वापर प्रवाशांना करावा लागत आहे. अतिशय घाणेरडय़ा अवस्थेत असूनही पर्याय नसल्याने प्रवासी त्याचा वापर करतात.
  • पालघर स्थानक तसे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण. या स्थानकातून दररोज २६ हजार १५२ प्रवाशांकडून ८४ लाख ३१ हजार ५९० रुपयांचे मासिक उत्पन्न रेल्वेला मिळते. तरी येथे शौचालये पुरेशी नाहीत. फलाट क्रमांक २ वर एक शौचालय आहे, तर फलाट क्रमांक १ वर शौचालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकली आहे.
  • उमरोळी स्थानक तसे लहान असले तरी या भागातील प्रवाशांसाठी ते महत्त्वाचे आहे. येथे ३०० प्रवासी महिन्याला १ लाख ५६ हजारांचे उत्पन्न रेल्वेला देत आहेत. मात्र येथे शौचालयाबरोबरीने स्थानकाची दुरवस्था आहे. स्टेशन मास्तर यांचे दालन अत्यंत वाईट व अस्वच्छ आहे. पाणपोई असलेल्या ठिकाणीसुद्धा अस्वच्छता आढळते.

डहाणू : फलाट ३ वरील स्वच्छतागृह बंद

डहाणू रेल्वे स्थानकाला जंक्शन रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळूनही रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. येथून गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांचा मोठा रेटा आहे. डहाणू रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ आणि ५ वर दोन स्वच्छतागृहे सुरू आहेत. फलाट क्रमांक ३ वरील स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना रेल्वे पूल पार करून लघुशंकेस जावे लागत आहे.

वाणगाव  : देखभाल नसल्याने अस्वच्छ

वाणगाव रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिमेच्या जवळपास ६० हून अधिक गावांना जोडले आहे. येथून दूध उत्पादक, भाजीपाला, फुले उत्पादकांची सकाळपासून वर्दळ सुरू असते. प्रवाशांच्या तुलनेने येथे स्वच्छतागृहे मात्र देखभाल नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते. नाइलाजास्तव रेल्वे प्रवाशांना स्वच्छतागृहांचा आधार घ्यावा लागत आहे. मलवाहिनीची झाकणेच फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बोईसर : शौचालयाची अवस्था बिकट

कोटय़वधी रुपये उत्पन्न असलेल्या बोईसर स्थानकात सुविधांचा अभाव असून रेल्वे स्थानकावर एकच शौचालय असून त्याचीही अवस्था बिकट आहे. फलाट क्रमांक २ वर असलेले शौचालय कधी कधी बंद असल्याने शौचालयासाठी प्रवाशांना फलाट क्रमांक १ वर यावे लागते. त्यातच प्रवेशद्वाराजवळच तंबाखू, पान खाऊ न मोठय़ा प्रमाणात थुंकत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

उमरोळी : पाण्याअभावी बंद !

उमरोळी रेल्वे स्थानकावर एक शौचालय असून पाण्याअभावी त्याचा वापर प्रवाशांना करता येत नाही. शौचालयाला पाणीपुरवठा करण्याबाबत रेल्वे प्रशासन उदासीन आहे. उमरोळी येथे शौचालयाचे बांधकाम केल्यापासूनच त्याची पाण्याची कोणतीही सुविधा आजवर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना शौचालयाचा वापर करता येत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यातच बुकिंग ऑफिसची अवस्थादेखील बिकट आहे.

डहाणू रोड आणि घोलवड रोड रेल्वे स्थानकातील शौचालयाची मी  दौऱ्या दरम्यान प्रत्यक्ष पाहणी केली होती. मी प्रत्येक स्टेशन मॅनेजर यांना त्यांच्या स्थानकातील शौचालयाची पाहणी करण्याची सूचना दिली आहे. रेल्वे स्थानकातील यांत्रिकीकरण पद्धतीने सफाई करणे आणि शौचालयाची देखभाल करण्याची नव्याने कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही दिवसात परिस्थिती सुधारेल.

– संजय मिश्रा, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (डीआरएम) पश्चिम रेल्वे

बोईसर आणि उमरोळी स्थानकांतील स्वच्छतागृहांची अगदीच दुरवस्था झाली आहे. उमरोळी स्थानकात स्वच्छतागृहामध्ये सुरुवातीपासून पाण्याची सोयच नाही, तर बोईसर स्थानकात स्वच्छतागृहाची वेळच्या वेळी सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे.

– महेश पाटील, उपाध्यक्ष  डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

महिलांना वापरण्यासाठीची महिला स्वच्छतागृहे स्वच्छ व सुस्थितीत असावीत, मात्र येथे ती नाहीत, त्यामुळे गैरसोय होत आहे.

– प्रियल सुजित पाटील, केळवे महिला रेल्वे प्रवासी

डहाणू, बोईसर व पालघर अशा मुख्य स्थानकांवर महिलांकरिता स्वतंत्र महिला विश्रांतिगृह नाहीत

– विभाली म्हात्रे, महिला प्रवासी