शहापूर : बिबटय़ाची शिकार करणाऱ्या तसेच त्याच्या नखांची खरेदी-विक्री करणाऱ्या चौघांना शहापूर वनाधिकाऱ्यांनी अटक केली आहे. दादू सर्पे, सुभाष वाघचौडे, गौतम उबाळे आणि अविनाश भालेराव अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याजवळून बिबटय़ाची नखेही जप्त करण्यात आली आहेत. शहापूर न्यायालयाने चौघांना एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

शहापूर तालुक्यातील दापूर परिसरातील जंगलात दोन महिन्यांपूर्वी एका बिबटय़ाची शिकार करण्यात आली होती. दरम्यान, ही शिकार दापूर परिसरात राहणाऱ्या दादू सर्पे याने केल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. देशमुख, एम. एस. बोठे आणि पी. आर. चौधरी यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. तसेच त्याने बिबटय़ाच्या शिकारीनंतर त्याची नखे शिरोळ येथील सुभाष वाघचौडे याला विकली असल्याची माहिती दिली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी सुभाषला ताब्यात घेतले. सुभाषने ही नखे गौतम उबाळे आणि अविनाश भालेराव यांना विकली असल्याचे चौकशीमध्ये समोर आले. गौतम आणि अविनाशचा शोध घेऊन वनाधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्या घरात बिबटय़ाची नखे आढळून आली. या प्रकरणी दादू सर्पे, सुभाष वाघचौडे, गौतम उबाळे आणि अविनाश भालेराव या चौघांविरुद्ध

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास साहाय्यक वनसंरक्षक आर. एस. पाटील करीत आहेत.