ठाणे : केंद्र शासनाने बंदी घातलेल्या ‘ट्रॅमोडॉल’ या गुंगीकारक आणि वेदनाशामक औषधांची विक्री करण्यासाठी आलेल्या चार जणांच्या टोळीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून १२ लाख रुपयांचा औषधाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत पाच कोटींच्या घरात आहे.

भारताप्रमाणेच काही देशांमध्ये या औषधांवर बंदी घातल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या औषधांची भारतात आणि परदेशात विक्री केली जाणार होती, असेही पोलिसांनी सांगितले.

मयूर मेहता, रोमेल वाज, संतोष रघुनाथ पांडे आणि दीपक कोठारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी मयूर, रोमेल आणि संतोष हे मुंबईचे तर दीपक कोठारी हा अहमदाबादचा रहिवासी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ट्रॅमोडॉल या औषधावर बंदी घातली असून केंद्र शासनाने एप्रिल २०१८ मध्ये या अंौषधावर बंदी घातली आहे. औषधाची विक्री होत असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके आणि विकास घोडके यांच्या पथकाने घोडबंदरमधील ब्रह्मांड परिसरातून मयूरला अटक केली. या कारवाईदरम्यान त्याच्याकडून १२ लाख ७९ हजार ५०० रुपायांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत पाच कोटींच्या घरात आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

औषधाची भारतात आणि परदेशात बेकायदा विक्री करण्यात येणार होती. अटक करण्यात आलेल्या चौघांना ठाणे न्यायालयाने १ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आंतरराष्ट्रीय टोळी?

या औषध विक्री प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी वर्तवली आहे.