वाडा येथे वन विभागाची कारवाई

वाडा : मांडूळ या दुर्मीळ प्रजातीच्या सर्पाची तस्करी करणाऱ्या चौघांना वाडा वन परिक्षेत्र पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केली. या चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा वन परिक्षेत्र पश्चिम विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांना या भागामध्ये मांडूळ तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चौरे यांनी स्वत: ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला आणि मांडूळ प्रजातीच्या सापासंदर्भात ३० लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केला. प्रत्यक्ष मांडूळ पाहायचे आहे, असे सांगून त्यांनी आरोपींना मनोर येथील मस्तान नाका येथे भेटण्यास बोलावले. त्याआधारे आरोपी मांडूळ घेऊन आल्यानंतर  साप हस्तगत करून तात्काळ आरोपींना अटक करण्यात आली.

हरिश्चंद्र पवार, संजय भंडारी, तुकाराम हरवटे, त्रिंबक लिलका अशी आरोपींची नावे असून ते भाईंदर आणि विक्रमगड येथील रहिवासी आहेत.  औषधनिर्मिती आणि जादूटोण्यासाठी मांडूळ प्रजातीच्या सापांचा वापर केला जातो. त्यामुळे या सापांची लाखो रुपयांची तस्करी केली जाते. या कारवाईमध्ये अविनाश कचरे, दशरथ कदम, सुरेंद्र ठाकरे आदी वन कर्मचारी सहभागी झाले होते.

मांडुळाच्या तस्करीसंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. तिच्या आधारे आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. – संदीप चौरे, परिक्षेत्र अधिकारी, वाडा पश्चिम