News Flash

घोडबंदरमध्ये चार सट्टेबाजांना अटक

सट्टेबाज प्रविण बेरा हा पोलिसांच्या रडारावर आला असून पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.

लॅपटॉप, आठ मोबाईल जप्त; मुख्य सूत्रधार फरार
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रीकेट स्पर्धेमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड या सामन्यासाठी सट्टा चालविणाऱ्या चार सट्टेबाजांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून एक लॅपटॉप तसेच आठ मोबाईल जप्त करण्यात आले. सट्टा लावणाऱ्यांच्या नोंदी घेण्याकरीता लॅपटॉपचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तसेच या कारवाईमुळे मुंबईतील कुविख्यात सट्टेबाज प्रविण बेरा हा पोलिसांच्या रडारावर आला असून पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.
संजय मनसुखलाल मानके, प्रतिक मेघजी राघवाणी, जगदीश रणछेडा पटेल, अरविंद मन्नालाल अग्रहरी अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यापैकी अरविंद हा मुलूंड भागात रहातो तर उर्वरित तिघे ठाणे परिसरात रहातात. हे चौघेजण घोडबंदर येथील हावरे सिटीमधील एका सदनिकेमधून ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रीकेट स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने शनिवारी सदनिकेमध्ये धाड टाकली. त्यावेळी सदनिकेमध्ये एलसीडी टिव्हीवर श्रीलंका विरुद्ध इंग्लड या संघांचा सामना सुरू होता. या सामन्याच्या निकालावर प्रतिक राघवाणी हा फोनवरून सट्टा लावणाऱ्यांची बुकींग घेण्याचे तर हि माहिती संजय मानके हा त्याच्या लॅपटॉपवर नोंदविण्याचे काम करताना आढळून आला. या धाडीदरम्यान पोलिसांनी सदनिकेमधून एक लॅपटॉप, एक एलसीडी, सेटअप बॉक्स आणि आठ मोबाईल असा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी मुंबईतील कुविख्यात सट्टेबाज प्रविण बेरा आणि त्याचा साथीदार निकुंज ठक्कर हे दोघे फरार असून या दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

बारबालांवर पैशांची उधळण..
घोडबंदर येथील हावरे सिटीमधील एका सदनिकेमध्ये संजय मानके हा सट्टा चालविण्याचे काम करायचा. एखाद्या क्रीकेट सामन्याचा निकाल काय असेल, याचा अंदाज बांधता येत नसतानाच त्या सामन्यासाठी बोलीची रक्कम वाढत गेली तर सट्टा चालविणाऱ्याला त्यातील नेमका फायदा व तोटय़ाचा अंदाज बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे ही जोखीम कमी करण्यासाठी संजय हा सट्टय़ाच्या रक्कमेवरच मुंबईतील कुविख्यात सट्टेबाज प्रविण बेरा उर्फ पि.डी आणि त्याचा साथीदार निकुंज ठक्कर यांच्याकडे सट्टा लावायचा. संजयप्रमाणेच ५० ते ६० सट्टेबाज अशाप्रकारेच प्रविण आणि त्याचा साथीदार निकुंज याच्याकडे सट्टा लावतात. मुंबई परिसरातील सर्वात मोठा सट्टेबाज म्हणून प्रविण बेरा याला ओळखले जाते. गेल्या दोन ते तीन वर्षांत त्याला विविध ठिकाणी अटक झाली असून या गुन्ह्य़ात दोघेजण फरार आहेत. तसेच या सट्टेबाजांनी बारबालांवर लाखो रुपये उधळल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2016 3:39 am

Web Title: four bookies arrested in ghodbunder
टॅग : Cricket Betting
Next Stories
1 बेघर होण्याच्या भीतीने डोंबिवलीतील नागरिक रस्त्यावर
2 आजोबाकडून नातवाच्या हत्येची सुपारी
3 महापालिकांची कर्जे स्वस्त!
Just Now!
X