News Flash

अखेर चार दिवसांचा ‘ड्राय डे’ रद्द

वसई तालुका हॉटेल असोसिएशनने याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

केवळ मतदान, मतमोजणीच्या दिवशीच पालन

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने लागू केलेला तीन दिवसांचा ‘ड्राय डे’ उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला आहे. वसई तालुका हॉटेल असोसिएशनने याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे, तर त्याची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी आणि ६ फेब्रुवारी असा ४ दिवसांचा ड्राय डे लागू केला होता. पालघर जिल्हय़ात २ हजार बार, वाइन शॉप आहेत. त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार होता. ३ फेब्रुवारीला मतदान आहे, तर १ तारखेपासून ड्राय डे का, असा सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे वसई तालुका हॉटेल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली आणि न्यायालयाने हा ड्राय डे रद्द केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता केवळ मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते संध्या ६ वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंतच ड्राय डे राहणार आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर वसईतील हॉटेल व्यावसायिकांनी जल्लोष साजरा केला आहे. याबाबत बोलताना वसई तालुका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी सांगितले की, पालघर जिल्हय़ात केवळ २०० मतदार आहेत. त्यासाठी चार दिवसांचा ड्राय डे हा मूर्खपणा होता. एका बारला प्रतिदिवशी शासनाची फी अडीच हजार रुपये, बिल, कर्मचारी पगार मिळून १५ हजार रुपये खर्च असतो. तीन दिवसांत त्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असते. न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याचे उपाध्यक्ष नागराज शेट्टी यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र पाटील यांनी ‘ड्राय डे’विरोधात आवाज उठवून ते बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:53 am

Web Title: four days dry days cancle
Next Stories
1 सहज सफर : पक्ष्यांचे खेळघर : मिठागर
2 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन हीच जगण्याची ऊर्जा!
3 गडकरी पुतळ्याचा वाद साहित्य संमेलनातही उमटणार?
Just Now!
X