चौथ्या दिवशीही संपाचा तिढा कायम; ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

वसई : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन कर्मचारी संघटनेचा संप सलग चौथ्या दिवशी कायम आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचारी आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी चौथ्या दिवशी दोन संघटनांच्या केवळ ३० बस रस्त्यावर उतरल्याने नागरिकांचे हाल कायम झाले. शुक्रवारी उशिरापर्यंत संपावर तोडगा निघालेला नव्हता.

वसई-विरार महापालिका परिवहन संपाचा तिढा अजूनही कायम आहे. वसई-विरार महापालिका कार्यालयात बैठकाच्या बैठका होत आहेत. पण यावर सध्या कोणताही तोडगा निघत नसल्याने सलग चौथ्या दिवशीही निम्म्याहून अधिक बस आगारात उभ्या आहेत. मुळात या संपात तीन कामगार संघटना सामील झाल्या होत्या. यातील श्रमजीवी आणि बहुजन विकास आघाडी यांनी काही प्रमाणात बस वसई आणि नालासोपाराच्या काही भागात बस सुरू केल्या आहेत. पण विरारमध्ये अजूनही एकही बस धावली नाही.

१० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचा एकरकमी पगार, थकीत असलेला भविष्यनिर्वाह निधी, महागाईभत्ता या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात  कर्मचारम्य़ांना देण्यात आले होते. मात्र या चार दिवसांचा कामबंद आंदोलनाच्या काळातील त्यांचा पगार हा वजा होऊन येणार असल्याचे आगार व्यवस्थापक तुकाराम शिवभक्त यांनी सांगितले होते. त्यामुळे या आंदोलनाचा फटका देखील नागरिकांसह कर्मचारम्य़ांना देखील सहन करावा लागणार आहे. संप करण्याच्या १४ दिवस आधी पूर्वकल्पना प्रशासनाला देणे गरजेचे आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता कामबंद आंदोलन या कर्मचाऱ्यांनी पुकारले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यात सध्या १६० बस आहेत. आणि ७०० हून अधिक कामगार संपावर गेल्याने मागील चार दिवसांपासून या बस रस्त्यावर उतरल्या नाहीत. यात आता वसई पश्चिमेला २० तर नालासोपारा येथे केवळ १० बस सुरू झाल्या आहेत. बहुजन कामगार संघटना आणि श्रमजीवी संघटनेचे कर्मचाऱ्यांच्या ३० बस उतरल्या. मात्र मनसे कामगार सेनेने आपल्या संघटनेची एकही बस रस्त्यावर उतरू दिली नाही. यामुळे हजारो प्रवासी अतिरक्त भाडे देऊन प्रवास करत आहेत अथवा पायपीट करत कामावर ये-जा करत आहेत.

संपावर तोडगा निघत नसल्याने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाला ५० बस देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ठेकेदार आणि कर्मचारी क्षुल्लक मुद्यांवरून मनमानी करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दुसरीकडे परिवहन ठेका चालवणाऱ्या ठेकेदाराने संपावर तोडगा काढण्याऐवजी सेवेतून मुक्त करा, असे पत्रच पालिकेला दिले आहे. त्यामुळे पालिका चांगलीच अडचणीत सापडली आहे.

परिवहन सेवेतील कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी नसल्याने त्यांना सेवा बंद करण्याचा अधिकार नाही. हा वाद ठेकेदार आणि कर्मचारी यात आहे. त्यांनी लवकर तोडगा काढावा नाहीतर ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जाईल. – डॉ कैलास शिंदे, प्रभारी आयुक्त, वसई-विरार महापालिका

आम्ही संपकरी संघटना आणि कर्मचाऱ्यांशी सातत्याने बोलणी करत आहोत. मात्र ते संप मागे घेण्याच्या स्थितीत नाहीत. यातून आडमुठेपणाची भूमिका दिसून येत आहे, तरी संपावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.

– प्रितेश पाटील, सभापती, परिवहन समिती, वसई-विरार महापालिका