मुंब्रा येथील शिमला पार्क भागातील प्राइम क्रिटिकेअर या बिगर करोना रुग्णालयामध्ये बुधवारी पहाटे आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार रुग्ण दगावले. रुग्णालयातील विद्युत मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या रुग्णालयात एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. त्यामध्ये अतिदक्षता विभागात सहा तर इतर विभागात १४ रुग्ण होते. या रुग्णालयातील विद्युत मीटर रूममध्ये बुधवारी पहाटे ३.४० वाजता आग लागली. त्यानंतर रुग्णालयातील विद्युत दिवे बंद होऊन सर्वत्र धूर पसरला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक स्वत: रुग्णालयाबाहेर पडले होते. तर, ९ रुग्णांना परिसरातील नागरिकांनी मागील भागात असलेल्या खिडकीतून बाहेर काढले. या रुग्णांना परिसरातील इतर रुग्णालयामध्ये नेत असताना चार रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने ५ लाखाची आणि जखमींना १ लाखाची तर, ठाणे महापालिकेच्या वतीने ५ लाखांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रत्येक रुग्णालयाची अग्निशमन सुरक्षा, बांधकाम आणि प्राणवायू या सर्वांचे परीक्षण लवकरात लवकर करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले.

दुर्घटना कारण…

रुग्णालयातील आग अतिदक्षता विभागामध्ये लागली नव्हती. रुग्णांना बाहेर काढताना गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. यास्मीन सय्यद (४६), नवाब शेख (४७), हलिमा सलमानी (७०) आणि हरीश सोनावणे (५७) अशी मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे आहेत.