ठाणे : मुंब्रा आणि भिवंडी शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चारजण ठार झाले आहेत. त्यापैकी एका अपघातात मृत पावलेले दोघे जण भाऊ असल्याचे समोर आले आहे. या अपघातांप्रकरणी मुंब्रा, शीळ-डायघर आणि नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यासिन चौधरी (२८), कु लसूम शेख (३२), विश्वास भोईर (४०) आणि निळकंठ भोईर (३२) अशी मृतांची नावे आहेत. त्यापैकी विश्वास आणि निळकंठ हे दोघे भाऊ आहेत. मुंब्रा भागात राहणारे मोहम्मद अब्दुल चौधरी आणि यासिन चौधरी हे दोघे सोमवारी सकाळी दुचाकीने मुंब्य्राहून शिळफाटय़ाच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून आलेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अब्दुल आणि यासिन जखमी झाले. त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे यासिन चौधरी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

दुसरा अपघात मुंब्रा येथील बाह्य़वळण मार्गावर रविवारी पहाटे झाला. मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून हर्शद शेख हे दुचाकीवरून झारा शेख आणि कु लसूम शेख यांना मुंब्य्राच्या दिशेने घेऊन जात होते. त्यावेळी मोनू पांडे (२२) याने भरधाव रिक्षा चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत हर्शद, झारा आणि कुलसूम हे जखमी झाले. या अपघातात कुलसूम यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात मोनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तिसरा अपघात भिवंडी येथील नारपोली भागात रविवारी दुपारी झाला. अंजूर येथील भरोडी गावात राहणारे विश्वास आणि निळकंठ हे दोघे भाऊ परिसरातील गोदामात काम करतात. रविवारी दुपारी ते एका दुचाकीवरून कामाला जात होते. त्यावेळेस भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात विश्वास आणि निळकंठ यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.