खाडीपुलापासून रेतीबंदरपर्यंत चार किलोमीटरचा रस्ता

कळव्यातील वाहनकोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून कळवा खाडीपुलापासून रेतीबंदर येथील आत्माराम पाटील चौकापर्यंत खाडीकिनारी तब्बल चार किलोमीटरचा बाह्य़वळण रस्ता उभारला जाणार आहे. त्यामुळे कळव्यातील मुख्य रस्त्यावरील कोंडीचा भार कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या रस्त्यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्याने साकेत मार्गे मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना नव्या बाह्य़वळण रस्त्यानेही महामार्ग गाठणे शक्य होणार आहे.

कळव्यातील वाहतुकीसाठी ठाणे-बेलापूर आणि कळवा-खारीगाव हे दोन रस्ते महत्त्वाचे मानले जातात. हे दोन्ही रस्ते खाडी पुलालगत असलेल्या कळवा चौकात येऊन मिळतात. नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि कोकणातील वाहतुकीसाठी ठाणे-बेलापूर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. तर मुंब्रा आणि पनवेल भागातील वाहतुकीसाठी कळवा-खारीगाव हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. कळवा-खारीगाव परिसराचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेला रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडून कोंडी होऊ लागली आहे. ही कोंडी भेदण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे हटवून रस्त्याचे रुंदीकरण केले, मात्र त्यानंतरही येथील कोंडीची समस्या फारशी सुटू शकली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता विकास आराखडय़ातील कळवा बाह्य़वळण रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या रस्त्याचा प्रकल्प अहवाल यापूर्वीच प्रशासनाने तयार केला असून त्यानुसार रस्त्याच्या निर्मितीसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याचा खर्च एमएमआरडीच्या निधीतून व्हावा यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी एमएमआरडीकडे तसा प्रस्ताव पाठविला होता. त्यास एमएमआरडीएने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याच्या बांधणीचा प्रस्ताव तयार करून तो येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

रस्त्याचे स्वरूप

* कळवा खाडीपूल ते आत्मराम पाटील चौक असा ३० मीटर रुंद आणि ३.८५ किमी लांबीचा हा रस्ता असेल. आराखडय़ानुसार ३.८५ किमी लांबीपैकी १.८५ लांबीचा रस्ता खाडीलगत आहे. मात्र, हा परिसर सीआरझेडमध्ये येतो. त्यामुळे या ठिकाणी उन्नत मार्ग उभारणीचा विचार आहे. या रस्त्यासाठी भूसंपादन महापालिका करणार असून त्यापैकी ५७ टक्के जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

* आत्माराम पाटील चौकातून पुढे मुंबई-नाशिक महामार्गावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्याने साकेत मार्गे मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी नवा बाह्य़वळण रस्ता पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होऊ शकेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.