शॉर्टसर्किटमुळे पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज; स्थानिकांना घातपाताचा संशय
पुणे आणि नाशिकमध्ये घडलेल्या वाहन जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी रात्री डोंबिवलीतील एका गृहसंकुलातील चार मोटारसायकली अचानक आग लागून जळाल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून वाहनांनी पेट घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र इमारतीतील रहिवाशांनी या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र इमारतीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने नेमके काय घडले, हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही.
डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर परिसरातील योग संकुल सोसायटीतील चार मोटारसायकलींनी बुधवारी मध्यरात्री अचानक पेट घेतला. गाडय़ांनी अचानक पेट घेतल्याने गाढ झोपेत असलेले नागरिक जागे झाले आणि त्यांनी त्वरित गाडय़ांवर पाणी टाकून आग विझवली. केदार गोलतकर, रुपेश चव्हाण, शैलेश दळवी व वीरेंद्र प्रभू या नागरिकांच्या गाडय़ा जळाल्या आहेत. केदार गोलतकर यांची मोटारसायकल पूर्णत जळून खाक झाली, तर अन्य तीन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. जवळच असलेल्या सायकलीलाही आगीची झळ बसली.
या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी हा शॉटसर्किटचा प्रकार असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र इमारतीतील रहिवाशांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. इमारतीच्या तळमजल्यावरच राहत असलेल्या केदार यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री तीनच्या सुमारास गाडीने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी धावत येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांची गाडी जळून खाक झाली. आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. मात्र ती कुणी तरी लावली असावी, असा संशय रुपेश चव्हाण यांनी व्यक्त केला. तर ‘अचानक आग लागून इतक्या कमी वेळात गाडी पूर्णत: जळून खाक होणे अशक्य आहे. गाडीवर कोणी तरी ज्वालाग्राही रसायन टाकले असावे,’ असा संशय शैलेश दळवी यांनी व्यक्त केला.