जिल्हा परिषदेत पुन्हा सर्वपक्षीय सत्तेचा पॅटर्न

ठाणे : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका गुरुवारी पार पडल्या असून या निवडणुकींमध्ये पुन्हा सर्वपक्षीय सत्तेचा पॅटर्न दिसून आला आहे. सत्ताधारी शिवसेनेने दोन सभापती पदे आपल्याकडे ठेवत एक भाजपाला आणि एक राष्ट्रावादीला देत पुन्हा सत्तेत सहभागी करून घेतले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती आणि दोन विशेष समिती सभापती पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै रोजी संपुष्टात आला. त्यामुळे या चार समित्यांच्या पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळाकरिता सभापती पदांसाठी गुरुवारी ठाण्यातील कापूरबावडी भागात असणाऱ्या गोयंका इंटरनॅशनल शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून अविनाश शिंदे यांनी काम पाहिले.

या निवडणुकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेने महिला व बालकल्याण समिती सभापती पद आणि एक विशेष समिती सभापती पद आपल्याकडे ठेवत समाज कल्याण समिती सभापती पद भाजपाला आणि एक विशेष समिती सभापती पद राष्ट्रवादीला देत सत्तेत सामील करून घेतले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय पॅटर्न पुन्हा एकदा दिसून आला आहे. या निवडणुकीत समाज कल्याण समितीच्या सभापती पदी भाजपच्या नंदा उघडा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी शिवसेनेच्या रत्नप्रभा तारमळे, तर दोन विशेष समिती सभापती पदी अनुक्रमे शिवसेनेचे कुंदन पाटील आणि राष्ट्रवादीचे संजय निमसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी निवड झालेल्या शिवसेनेच्या रत्नप्रभा तारमळे या खारबाव गटातून तर समाज कल्याण सभापती पदी निवड झालेल्या भाजपच्या नंदा उघडा या वैशाखरे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. तसेच विशेष समिती सभापती पदी निवडून आलेले शिवसेनेचे कुंदन पाटील हे पूर्णा गटातून तर राष्ट्रवादीचे संजय निमसे हे चेरपोली गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.