कोणत्याही प्राण्याच्या शारीरिक जडणघडणीतून त्या प्राण्याचे वेगळेपण सामान्य व्यक्तीला कळते. शारीरिक वेगळेपण हे त्या प्राण्याची ओळख बनते. श्वान जातींमध्येदेखील अशा शारीरिक वेगळेपणातून एखादी श्वान प्रजात कोणती असेल याचा अंदाज बांधला जातो. श्वान प्रजातींमध्ये असेच इतर कुत्र्यांपेक्षा वेगळे दिसणारे श्वान ब्रीड आहे फॉक्स टेरिअर. भारतीय कुत्र्यांशी फारसे साधम्र्य न साधणाऱ्या या परदेशी श्वान प्रजातींचा इतिहासदेखील परदेशातच उलगडतो. मूळचे इंग्लंड देशातील असणाऱ्या फॉक्स टेरिअर या कुत्र्यांच्या दोन स्मूत फॉक्स टेरिअर आणि वायर फॉक्स टेरिअर अशा दोन जाती आढळतात. १७९० साली फॉक्स टेरिअर या कुत्र्यांची दखल घेतली गेली. अठराव्या शतकात इंग्लिश रोमन लोकांनी फॉक्स टेरिअर हे श्वान ब्रीड विकसित केले. कर्नल थॉमस थोरटोन यांनी काढलेल्या एका चित्रात फॉक्स टेरिअर या कुत्र्याचे चित्र काढण्यात आले होते.
पीच असे त्या चित्रातील कुत्र्याचे नाव. तेव्हापासून फॉक्स टेरिअर हे श्वान बीड इंग्लंडमधील
लोकांच्या परिचयाचे झाले. १८७० साली इंग्लंडमध्ये या ब्रीडची नोंद झाली. कालांतराने १८७६ साली इंग्लंडमध्ये फॉक्स टेरिअर क्लब ऑफ इंग्लंड असा क्लब स्थापन झाला आणि हे ब्रीड जगभरात प्रसिद्ध झाले.
‘स्मूथ फॉक्स टेरिअर’ कुत्र्यांच्या शरीरावर बारीक केस असतात तर वायर ‘फॉक्स टेरिअर’ कुत्र्यांच्या तोंडावर आणि पायावर केसांचे आवरण असते. डॉग शोजमध्ये ‘वायर फॉक्स टेरिअर’ कुत्र्यांना जास्त मागणी आहे. मुख्य रंग पांढरा आणि त्यावर तपकिरी, करडा किंवा काळ्या रंगाचे पट्टे या कुत्र्यांच्या शरीरावर आढळून येतात.

इंग्रजांसोबत भारतात आलेले पाहुणे श्वान
भारतात फॉक्स टेरिअर हे श्वान ब्रीड इंग्रजांकडून आणले गेले. भारतातील त्या काळातील राजे मंडळींना शिकारीचा छंद असल्याने काही श्रीमंत राजांनी हे फॉक्स टेरिअर कुत्रे पाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतात या कुत्र्यांचा प्रसार झाला. अतिश्रीमंत वर्गाकडे प्रतिष्ठा म्हणून हे कुत्रे पाळले जायचे.

कोल्ह्याच्या शिकारीसाठी उपयुक्त

पूर्वी इंग्लंडमध्ये कोल्ह्याचे फर काही कामासाठी उपयुक्त ठरत होते. अशा वेळी कोल्ह्यांच्या शिकारीसाठी फॉक्स टेरिअर कुत्रे वापरले जायचे. कोल्ह्यांच्या बिळात शिरून त्यांची शिकार करण्यात फॉक्स टेरिअर कुत्रे तरबेज होते. अतिशय चपळ हे ब्रीड बिनधास्त बिळात घुसून कोल्ह्यंना जिवंत तोंडात पकडून आणत असत. अलीकडे मात्र शिकारीसाठी या कुत्र्यांचा उपयोग कमी झाला आहे.

चालण्याची विशिष्ट लकब.

सामान्य कुत्र्यांपेक्षा आपले शारीरिक वेगळेपण असणाऱ्या फॉक्स टेरिअर कुत्र्यांना विविध डॉग शोजमध्ये लोकप्रियता आहे. या कुत्र्यांची चालण्याची विशिष्ट लकब कोणत्याही डॉग शोजमधील परीक्षकांना आकर्षित करते. इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या डॉग शोजमध्ये हे उत्कृष्ट कुत्रे अशा जास्तीतजास्त पुरस्कारांनी नावाजले जातात.

सतत खेळण्याची आवड
फॉक्स टेरिअर कुत्रे चपळ असल्याने सतत धावणे, मोकळ्या जागेत दिवसभर खेळत राहणे अशी या कुत्र्यांची आवड आहे. खेळायला किंवा धावायला मिळाले नाही तर मानसिकदृष्टय़ा हे कुत्रे खचतात. यासाठी नियमित धावणे, खेळायला जागा उपलब्ध करून देऊन शारीरिक हालचालीतून त्यांचा व्यायाम होणे गरजेचे असते. सतत कामात व्यस्त ठेवल्यास हे कुत्रे अधिक चांगल्या प्रकारे राहू शकतात. झाडाझुडपातून प्राणी, कीटक शोधून काढण्यात हे कुत्रे आपला वेळ मजेत घालवतात. या कुत्र्यांची वजन आणि उंची कमी असते. त्यामुळे सांभाळण्यास कठीण जात नाही.