|| ऋषिकेश मुळे-गीता कुळकर्णी

जिल्ह्य़ातील ३३ स्थळांखेरीज नव्या प्रेक्षणीय ठिकाणांचाही विकास करणार

ठाणे : विस्तीर्ण खाडी किनारा,  हिरवेगार डोंगर आणि प्राचीन संस्कृतीची साक्ष देणारी वारसास्थळे यांनी नटलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ३३ पर्यटनस्थळांखेरीज आणखी नवीन पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. या संदर्भात वित्तमंत्री, पालकमंत्री, जिल्ह्य़ातील आमदार यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत मुरबाड येथे दर्शनी गॅलरी उभारण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागाचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरिकीकरण झाले असून वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची ओरड सातत्याने होत आहे. असे असले तरी जिल्ह्य़ामधील जुनी ३३ पर्यटनस्थळे अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. या पर्यटनस्थळांना मुंबई आणि आसपासच्या शहरातील नागरिकांकडून पसंती मिळत असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने आता या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्य़ामध्ये ‘क’ दर्जाची ३३ पर्यटनस्थळे असून त्यामध्ये ऐतिहासिक किल्ल्यांसह, जंगल, खाडी अशा निसर्गरम्य ठिकाणांसह धार्मिक स्थळांचा समावेश आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध तालुक्यांमधील गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई, उपनगरे तसेच राज्यातील इतर ठिकाणांहून नागरिक ठाणे जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांना मोठय़ा प्रमाणावर भेटी देत आहेत. त्यामुळे या पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे. मुरबाड येथील व्हिविंग गॅलरीच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यास तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. या संदर्भात वित्तमंत्री, पालकमंत्री, जिल्ह्य़ातील आमदार आणि अधिकारी यांची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही नार्वेकर म्हणाले.

नवे प्रकल्प

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरूअसून त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. खाडी सुशोभीकरण प्रकल्प, पारसिक चौपाटी, वाहतूक उद्यान, फुलपाखरू उद्यान आणि विविध उद्याने विकसित करण्यात येत आहेत. याशिवाय, येऊर परिसरात आदिवासी पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे.

जिल्ह्यतील प्रमुख पर्यटनस्थळे

टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिर, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर, भिवंडी येथील वज्रेश्वरी देवीचे मंदिर,  माळशेज डोंगराच्या पायथ्याजवळील थितबी गावातील पर्यटन केंद्र, मुरबाड, शहापूर, बारवी डॅम, बदलापूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ऐरोली येथील जैवविविधता उद्यान, ठाणे खाडी परिसर