सारस्वत कॉलनीमधील रहिवाशांना फसविण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्ता, पेंडसे नगर, सारस्वत कॉलनीमधील रहिवाशांच्या दारात जाऊन आपण ‘एलआयसी’ एजंट आहोत. तुमचा ‘एलआयसी’चा हप्ता थकला आहे. साडेसहाशे रुपये द्या,’ असे सांगून वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या भामटय़ाचे उद्योग अजूनही सुरूच आहेत.
गेल्या आठवडय़ात सावरकर रस्त्यावरील पुष्कराज सोसायटीत जाऊन या रहिवाशाने कुसुम पांडे या वृद्धेकडून ‘तुमच्या मुलाचा एलआयसीचा हप्ता थकला आहे. तो वसूल करण्यासाठी आलो आहे,’ असे सांगून साडेसहाशे रुपये वसूल करण्याच्या नावाखाली एक हजाराची नोट घेऊन पलायन केले होते. सोमवारी, मंगळवारी या भामटय़ाने सारस्वत कॉलनीतील उमेश कामत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना आपण एलआयसी एजंट आहोत. तुमचा एलआयसीचा हप्ता थकला आहे. तो वसूल करण्यासाठी आलो आहे, असे सांगून फसविण्याचा प्रयत्न केला. पण कामत कुटुंबीयांनी असा काही आम्ही हप्ता थकविला नाही, असे ठणकावून दरवाजा बंद केल्याने तो भामटा निघून गेला. त्यानंतर सारस्वत कॉलनीत आणखी दोन ते तीन ठिकाणी या बोगस एजंटने रहिवाशांना फसविण्याचा प्रयत्न केला असल्याचे या भागातील रहिवाशांकडून समजते.
रामनगर पोलिसांनी या भागात गस्त वाढवून या भामटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. डोंबिवलीतील प्रत्येक रहिवाशाने आपल्या दारात कोणी एलआयसीचा हप्ता वसूल करण्यासाठी आलो आहे, असे सांगून आला तर आलेल्या व्यक्तीची खातरजमा करून थेट पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याची मागणी सावरकर रोड रहिवासी मित्र मंडळाने केली आहे. अशा भामटय़ांची टोळी कार्यरत असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.