न झालेली कामे दाखवून दीड कोटींचा निधी हडपल्याचा आरोप; पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

वसईतील दुरवस्था झालेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीच्या नावाखाली दीड कोटी रुपये हडप करण्यात आले आहेत. या वसाहतीच्या दुरुस्तीचा खर्च केवळ कागदोपत्री खर्च करण्यात आलेला आहे. मात्र दुरुस्ती झाली नाही, मात्र हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हडप करण्यात आला, अशी माहिती माहिती-अधिकारातून उघड झाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वसई पश्चिमेच्या वसई पोलीस ठाण्याच्या मागे जुनी पोलीस वसाहत आहे. त्यात एकूण सहा इमारती आहेत. त्यात पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहत आहेत; परंतु या पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून पोलीस कर्मचारी येथे हालाखीचे जीवन जगत आहेत. ही वसाहत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. त्याची डागडुजी, दुरुस्ती या विभागामार्फत केली जाते. येथील कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता; परंतु त्यांना चालढकल करणारी उत्तरे दिली जात होती. अखेर रहिवाशांनी माहिती अधिकाराद्वारे किती खर्च केला याबाबतची माहिती मागवली. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. २००९ ते २०१५ या सहा वर्षांत या पोलीस वसाहतींवर तब्बल १ कोटी ५६ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती देण्यात आली. आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून येथे राहत आहोत; परंतु कुठलेही काम झालेले नाही. मग हा पैसा गेला कुठे, असा सवाला येथील महिला सुकेशिनी कांबळे यांनी केला. खिडक्यांची दुरुस्ती, घरांची दुरुस्ती, डागडुजी आदी कामांसाठी प्रत्येकी पाच पाच लाख रुपये दर वर्षी खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. ही धूळफेक असून कुठल्याही प्रकारची अशी कामे झाली नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. ही सर्व कामे बोगस असून त्याची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ही कामे झालेली आहेत मग वसाहतीची ही दुर्दशा का, असा सवालही त्यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी येथील महिलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक बंगल्याची रंगरंगोटी, स्वयंपाकघरात ३० ते ३५ टाईल्स तसे काही हजार रुपयांची नळ जोडणी आणि किरकोळ दुरुस्तीची कामे केली आहेत. बाकी सर्व कामे कागदोपत्री झाल्याचे दाखवून हा कोटय़वधी रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

पोलीस वसाहतीची दुरवस्था

  • घरातील कौलांमधून पाणी गळते.
  • दरवाजे, खिडक्या जुनाट आणि खिळखिळ्या.
  • घराच्या भिंतींना तडे गेले असून त्या कोसळण्याच्या स्थितीत.
  • इमारतीची रंगरगोटी झालेली नाही की सिमेंटचा गिलावा करण्यात आलेला नाही.
  • शौचालयांचीही अवस्थाही बिकट.