डोंबिवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे भाऊ आहोत, असे सांगून एका जवाहिऱ्याकडून आणि इतरांकडून पाच लाख रोकडेसह इतर मौल्यवान ऐवज उकळलेल्या आरोपी गडकरी पिता-पुत्राने फसवणुकीतील साडेसात लाख रुपयांची रक्कम सोमवारी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जमा केली. इतरांकडून घेतलेली रक्कम आणि मौल्यवान वस्तू लवकरच पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार आहे, असे आरोपी गडकरींचे वकील अ‍ॅड. मंगेश कुसूरकर यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाला सांगितले.

डोंबिवलीतील रहिवाशी आनंद गडकरी आणि राजन गडकरी या पिता-पुत्राने केंद्रीय मंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे सांगून काही जणांकडून रोख रक्कम, मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या होत्या.

डोंबिवलीतील अमोल पळसमकर या जवाहिऱ्याशी मैत्री वाढवून या जोडीने त्यांना मंत्री गडकरी यांचा संदर्भ देऊन आयकर विभागाने जप्त केलेले सोने आपण तुम्हाला कमी किमतीत उपलब्ध करून देतो असे सांगून पाच लाख रुपये उकळले होते. गडकरी पिता-पुत्र शब्द पाळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच जवाहीर अमोल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी राजन, आनंद गडकरी यांना बंगळुरू येथून अटक केली होती. अटकेनंतर त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी झालेल्या सुनावणीवेळी आरोपी गडकरी पिता-पुत्रांचे वकील अ‍ॅड. मंगेश कुसूरकर, अ‍ॅड. कार्तिक चव्हाण यांनी फसवणूक झालेल्या रकमेतील सात लाख ५० हजार रुपये आरोपी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव यांच्याकडे जमा करत आहेत. उर्वरित इतरांची फसवणुकीतील रक्कम आणि मौल्यवान वस्तू लवकरच पोलीस ठाण्यात जमा करणार आहेत, असे सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणात त्यांचे म्हणणे सादर केल्यानंतर आरोपींना जामीन मिळेल, असे अ‍ॅड. कुसूरकर यांनी सांगितले.