महिलेला अटक; सहआरोपी फरार
घरबसल्या कमाई करण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची विशेषत: महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेला मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकरणात सहआरोपी असलेला तिचा पती फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माया करुणाकर मुलीया ऊर्फ माया शिरसाट व तिचा पती करुणाकर मुलीया यांनी मीरा रोडमधल्या महेश इंडस्ट्रियल इस्टेट येथे सुमती आर्ट्स या नावाने कार्यालय थाटले. घरबसल्या सहा ते तीस हजार रुपये कमवा, अशी जाहिरात या दाम्पत्याने करायला सुरुवात केली. जाहिरातीला भुलून येणाऱ्याला हे दाम्पत्य एक यंत्र खरेदी करायला सांगायचे, ज्याची किंमत ३ ते ७ लाख रुपये सांगितली जायची. या यंत्राद्वारे घरबसल्या पेपर प्लेट बनविण्यास सांगितले जायचे. कच्चा माल देण्याची तसेच तयार माल खरेदी करण्याची हमी हे दाम्पत्य देत असे. घरबसल्या चांगली कमाई करण्याचे स्वप्न दाखवले जात असल्याने समोरची व्यक्ती सहज फसली जायची. अशा प्रकारे बऱ्याच जणांनी मुलीया दाम्पत्याकडून यंत्रे खरेदी केली. मात्र यंत्र खरेदी केलेल्यांना कच्चा माल मिळालाच नाही. अनेक दिवस गेल्यानंतरही कच्चा माल मिळत नाही हे बघून आपण फसवले गेल्याची जाणीव यंत्र खरेदी करणाऱ्यांना झाली. मीरा रोड येथे राहणाऱ्या माला राय यांनी या प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथे हे यंत्र अवघ्या ९५ हजार रुपयांत मिळते; परंतु मुलीया दाम्पत्याकडे अन्य कोणताही कामधंदा नसल्याने त्यांनी हे यंत्र ३ ते ७ लाखांपर्यंत विकायला सुरुवात केली. मुलीया दाम्पत्याने असाच प्रकारे अन्य ठिकाणीही कार्यालये थाटून लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत सात जणांची २२ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. माया मुलीया हिला अटक करण्यात आली असून करुणाकर फरार झाला आहे.