जागा हस्तांतरास ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

मीरा रोड येथे साकारणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील पहिल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र उभे राहणार असलेली जागा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतर करण्यास मंजुरी दिली आहे. सुमारे ३३ कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे केंद्र उभे राहाणार आहे.

मीरा रोड येथे सरकारी जागेतील ३८०० चौ.मी. जागेवर हे केंद्र बांधण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्र उभारणीस दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली होती. शासनाचा सामाजिक न्याय विभाग स्वखर्चाने केंद्राची इमारत अंतर्गत सजावटीसाठी बांधून देणार आहे, परंतु त्याआधी ही जागा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या विभागाकडे हस्तांतर होणे आवश्यक होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच या हस्तांतरास मान्यता दिली असून पुढील महिन्यापर्यंत जागेची कागदपत्रे सामाजिक न्याय विभागाच्या नावावर केली जाणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

ठाण्याजवळ कळवा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र सध्या सुरू आहे, परंतु विविध प्रकारच्या सोयीसुविधा असणारे बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र जिल्ह्य़ात पहिल्यांदाच मीरा रोड येथे साकारणार आहे. या सांस्कृतिक केंद्राचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. एकंदर तीन मजली वास्तूसाठी ३३ कोटी रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. इतका खर्च करण्याची मीरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने हा खर्च शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने करण्याची तयारी दाखवली आहे. लवकरच याबाबतच्या निविदा काढून इमारत बांधकाम सुरू केले जाणार आहे. मीरा रोड येथे न्यायालयाच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. त्याच्याच शेजारी हे बहुद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभे राहत आहे. या केंद्राच्या देखभालीची व्यवस्था महानगरपालिकेने करावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे देण्यात आला आहे.

सांस्कृतिक केंद्रातील सुविधा

  • इमारतीच्या तळघरात वाहनतळ तयार करण्यात येणार असून त्यात ५४ वाहने उभी करण्याची सुविधा असणार आहे. वास्तूच्या तळमजल्यावर विपश्यना केंद्र असणार आहे. यात एकाच वेळी ५६ लोक विपश्यना करू शकणार आहेत. याशिवाय तळमजल्यावर उपाहारगृहही असेल.
  • पहिल्या मजल्यावर मंगल कार्यालयासाठी ३९० आसन क्षमतेचे सभागृह बांधण्यात येणार असून गरीब कुटुंबांसाठी हे सभागृह मोफत देण्यात येणार आहे.
  • वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावर ३३० लोकांना सामावून घेणारे प्रदर्शन सभागृह आणि ८० आसन क्षमतेचे छोटे सिनेमागृह आहे. केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सिनेमागृहात शैक्षणिक चित्रफिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे पाहता येणार आहेत.
  • तिसऱ्या मजल्यावर ७० आसन क्षमतेचे वाचनालय असेल. यात बाबासाहेबांचे साहित्य, त्यांच्यावरील सीडी उपलब्ध करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधाही आहे. याशिवाय या मजल्यावर ५५ आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या निवासस्थानाची सोय असेल.