वेगवान वायफायची सशुल्क सुविधाही पुरवण्याची पालिका आयुक्तांची ग्वाही

येत्या सहा महिन्यांत ठाण्याला ‘वायफाय’युक्त शहर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी ही सेवा मोफत पदरात पाडून घेऊ इच्छिणाऱ्यांना ५१२ केबीपीएस इतकाच वेग उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक वेगवान नेटवर्क हवे असणाऱ्यांना सशुल्क सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. यासाठी आकारले जाणारे शुल्क किती असेल हे आताच सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. मोफत सेवेचा वेग कमी असला तरी वायफाययुक्त शहराच्या दृष्टीने उचलण्यात येणारे पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवे, असा दावाही त्यांनी केला.
ठाणे महापालिकेने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. शहर पोलिसांच्या एका कार्यक्रमानिमीत्त गुरुवारी ठाण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाचा संदर्भ देत सहा महिन्यांत संपूर्ण शहर वायफाययुक्त करू अशी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आयुक्त जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना या योजनेचा सविस्तर आराखडा सादर केला. ठाणे, कळवा, मुंब्रा शहरात शेकडो विजेचे खांब उपलब्ध असून त्यापैकी ४०० खांबांवर या सुविधेसाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभी केली जाणार आहे. हे करत असताना संबंधित कंपनीने ४०० सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच महापालिकेची विविध कार्यालये सीसी टीव्ही यंत्रणांना जोडण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात, असेही बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून त्यानंतर लगेच या कामास सुरुवात केली जाईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

वेगासाठी अतिरिक्त पैसे
मोफत वायफाय सेवा पदरात पाडून घेण्यासाठी महापालिकेकडे सुरुवातीला १०० रुपयांच्या नोंदणी शुल्काचा भरणा करावा लागेल. त्यानंतर ५१२ केबीपीएस इतका वेग उपलब्ध होऊ शकणार आहे. नेट वापरासाठी हा वेग पुरेसा असला तरी काहींना वेगवान सुविधा हवी असते. अशांसाठी अतिरिक्त शुल्क आकारून वेगवान सेवा पुरविण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. सध्या विविध दूरसंचार कंपन्यांमार्फत आकारल्या जाणाऱ्या शुल्कापेक्षा हे शुल्क निश्चितच कमी असू शकेल, मात्र ते किती असेल हे आताच सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क उपलब्ध आहे त्या भागात ही सेवा उपलब्ध होणार आहे.