‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या केवळ आवाजानेच शरीरात बळ संचारायचे. आझाद हिंद सेनेत काम करीत असताना त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची, पाहण्याची संधी मिळाली. त्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होता आले, ही माझ्यासाठी सर्वात भाग्यवान गोष्ट आहे,’ अशा शब्दांत अंबरनाथ येथील प्रीतमसिंग गुणवंतसिंग गिल यांनी स्वातंत्र्यसमरातील आठवणींना उजाळा दिला.
ब्रिटिशांना देशाबाहेर हाकलण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या रूपात उभारलेल्या सशस्त्र लष्करी लढय़ात सहभागी होणाऱ्यांत अनिवासी भारतीयांचे प्रमाण मोठे होते. मलेशियात जन्मलेले प्रीतमसिंग गिल त्यापैकीच एक. आझाद हिंद सेनेत पुरवठा विभागात प्रीतमसिंग यांची नेमणूक झाली होती. त्याच काळात सुभाषचंद्र बोस यांना भेटण्याची, तसेच त्यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली, ही आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचे प्रीतमसिंग सांगतात. गेल्याच महिन्यात सिंग यांनी ९५ वा वाढदिवस साजरा केला.
हिरोशिमा-नागासाकी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यावर जपानचे अवसान गळले आणि दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरले. इंग्रजांनी पुन्हा उचल खाल्ली. याच काळात प्रीतमसिंग गिल यांना अटक होऊन त्यांची रवानगी रंगून येथील कारागृहात झाली. एक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर १९४६ मध्ये ते भारतात आले. पंजाबमधील मोगा जिल्ह्य़ातील मेहना पराव गावात मग ते काही काळ राहिले. मात्र, तेथून ते महाराष्ट्रात दाखल झाले. प्राथमिक शिक्षण मलेशियात पूर्ण केलेल्या प्रीतमसिंग यांचे पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण मात्र नागपूरमध्ये झाले. पुढे महाराष्ट्रातच गृहरक्षक दलात त्यांनी नोकरी केली. राज्यात ठिकठिकाणी त्यांनी गृहरक्षक दलात सेवा बजावली. १९८१ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते अंबरनाथमध्ये स्थायिक झाले. वयोपरत्वे त्यांचे शरीर थकले असले तरी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षांच्या आठवणी त्यांच्या हृदयात अजूनही ताज्या आहेत.

आझाद हिंद सेनेची बँक
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक निवासी, अनिवासी भारतीय त्यांच्या सेनेत सामील झाले. मात्र, ज्यांना हे शक्य नव्हते, त्यांनी अन्य मार्गाने या लढय़ाला मदत केली. या वेळी आझाद हिंद सेनेकडे येणारा पैशांचा ओघ इतका वाढला की, सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेच्या नावाने स्वतंत्र बँक स्थापन करावी लागली, अशी आठवणही प्रीतमसिंग यांनी सांगितली.