सुहास बिऱ्हाडे suhas.birhade@expressindia.com @suhas_news

विरारमध्ये एका शाळकरी मुलीवर तिच्या मित्रासमक्ष दोन अनोळखी इसमांनी सामूहिक बलात्कार केला होता. मुंबईच्या गाजलेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणासारखी ही घटना होती. पोलिसांकडे कसलाच दुवा नव्हता. त्यामुळे या आरोपींना पकडणे मोठे आव्हान ठरले होते..

१५ एप्रिल २०१९. विरारमध्ये राहणारी १५ वर्षीय प्रिया (नाव बदललेले) रात्री आठच्या सुमारास जीवदानी रोड येथे राहणाऱ्या आपल्या काकांकडे निघाली होती. घरापासून काही अंतरावरच तिला तिचा मित्र रोहन (१६) भेटला. ते दोघेही गप्पा मारत निघाले. विरार पूर्वेला असलेल्या भास्कर ठाकूर नावाच्या शाळेमागील रस्त्यावरून लवकर पोहोचता येईल, या विचाराने हे दोघेही त्या मार्गाने निघाले. हा रस्ता तसा निर्जन असला तरी आजूबाजूला वस्ती असल्यामुळे त्या दोघांच्याही मनात कोणताही संशय आला नाही.

त्या निर्जन रस्त्यावरून दोघेही जात असतानाच दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना हटकले आणि त्यांची चौकशी सुरू केली. अचानक आलेल्या त्या दोघांना पाहून प्रिया आणि रोहन घाबरले. तेवढय़ात या दोघांनी रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्याला एका झाडाला बांधले. हा सगळा प्रकार इतक्या जलदगतीने घडला की प्रिया आणि रोहनला काही कळालेच नाही. त्यानंतर दोन्ही नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.

या घटनेने वसई विरार शहरात खळबळ उडाली. सुरुवातीला पोलिसांना हा बनाव असल्याचा संशय आला होता. मात्र नंतर खरंच अशी घटना घडल्याचे समजले. मुंबईतील गाजलेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणाप्रमाणेच ही घटना घडली होती. विरार पोलिसांनी त्वरित घटनास्थळाचा पंचनामा केला. विरार पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात सामूहिक बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तपासासाठी तीन विशेष पथके स्थापन करण्यात आली. घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे समोर आला होता.

ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाणी निर्जन होते. तो एरवी वापराचा रस्ता नव्हता. त्यामुळे या ठिकाणी हा गुन्हा करणारे आरोपी स्थानिक असावेत, अशी पोलिसांना शक्यता वाटत होती. त्यांनी खबऱ्यांना कामाला लावले. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्ता निर्जन असल्याने तेथे कॅमेरे नव्हते. मग पोलिसांनी घटना घडली तेव्हा परिसरातील मोबाइल मनोऱ्यांवरील नेटवर्कमधून केल्या गेलेल्या मोबाइल कॉलचा तपास सुरू केला. मात्र, त्यातून हजारो कॉलची माहिती समोर आली. या माहितीचा अभ्यास सुरू असतानाच पोलिसांचे खबरी परिसरातून कोणी बेपत्ता आहे का, याचा शोध घेत होते. पोलिसांनी परिसरातील शेकडो रिक्षाचालकांची चौकशीसुद्धा केली होती. हाती काही दुवा लागत नव्हता. दुसरीकडे सामूहिक बलात्काराचे आरोपी मोकाट असल्याने पोलिसांवर टीकेचा भडिमार होत होता.

पोलिसांनी मग अल्पवयीन मुलीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. पोलिसांनी तिला विश्वासात घेतले आणि तिने केलेल्या वर्णनानुसार आरोपींची रेखाचित्रे बनवली. यापैकी एक जाडा माणूस होता आणि त्याला फ्रेंच स्टाईलची दाढी होती, असे तिने सांगितले. बाकी तिला काही सांगता येत नव्हते. मात्र हे वर्णन अतिशय साधारण होते. त्यातून आरोपी कसा शोधायचा असा पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता. तरी देखील पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला होता.

दरम्यान, पोलिसांच्या खबऱ्याने एक माहिती दिली. या परिसरातील एक रिक्षाचालक अचानक गावी गेल्याचे त्याने सांगितले. मात्र घटना घडून काही दिवस तो तिथेच होता. गावी काही कामानिमित्त गेला असण्याची शक्यता होती. तरी पोलिसांनी त्याचा फोटो पाहिला. त्याचे वर्णन प्रियाने दिलेल्या वर्णनाशी मिळतेजुळते होते. पोलिसांना आशेचा किरण दिसू लागला. पोलिसांनी लगेच एक पथक सोलापूरला पाठवले. तेथून पोलिसांनी सुधाकर सुळे या एका आरोपीला ताब्यात घेतले. तो काहीच कबूल करत नव्हता. खाजगी कामानिमित्त गावी आल्याचे तो पोलिसांना सांगत होता. मात्र प्रियाने दिलेल्या वर्णनात एका आरोपीला फ्रेंच दाढी होती. आरोपी सुळे याला देखील फ्रेंच दाढी असल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि अधिक चौकशीत त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. तो रिक्षाचालक होता. त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही नंतर पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही आरोपी जीवदानी रोज परिसरात राहात होते. त्या दिवशी त्या निर्जन रस्त्यावरून जाताना त्यांना प्रिया आणि रोहन दिसले आणि त्यांनी हा डाव साधला. आपल्यावर संशय येईल म्हणून ते काही दिवस विरारमध्येच राहिले आणि नंतर गावी पळून गेले होते. मात्र प्रियाने दिलेल्या फ्रेंच दाढीच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलिसांनी या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा छडा लावला.