काही श्वानांच्या विशिष्ट गुणांमुळे नागरिकांमध्ये त्या श्वानांविषयी दहशत असते. या श्वानांचे दिसणे, रुबाब, आक्रमकता यामुळे संबंधित जातीचे श्वान म्हणजे धोका असा अनेकांचा समज होतो. श्वान जातींमध्ये बुल डॉग म्हटले की तडफदार, उत्तम राखण करणारे अशी ओळख पटते. या बुल डॉग प्रजातींमध्येच फ्रेंच बुल डॉग नावाचे श्वान सध्या जगभरात लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहेत. नावाने बुल डॉग असे संबोधले जात असले तरी दहशत, आक्रमकता ही बुल डॉगची जी खास वैशिष्टय़े आहेत ती फ्रेंच बुल डॉगमध्ये नाहीत. पाहता क्षणी भीती वाटेल अशी या श्वानांची शरीरयष्टी आणि रूप असले तरी स्वभावाला अतिशय खेळकर असणारे हे श्वान श्वानप्रेमींच्या अधिक पसंतीस पडत आहेत. फ्रेंच बुल डॉग या श्वान प्रजाती तयार करण्यात इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशांचा समावेश आहे. फ्रेंच बुल डॉग या श्वान प्रजातीमध्ये मूळ जात ओल्ड बुल डॉग या श्वानांची आहे. इंग्लडमधील ओल्ड बुल डॉग या जातीच्या श्वानांना फ्रान्समध्ये नेण्यात आले. फ्रान्समध्ये हे श्वान गेल्यावर फ्रान्समधील लहान आकाराच्या बुल डॉग जातीचे श्वान एकत्र करण्यात आले. मिश्र प्रजातीचे हे ब्रीड अमेरिकेत गेल्यावर अमेरिकेतील गोल आणि उभे कान असलेल्या बुल जातीच्या श्वानांमध्ये मिसळण्यात आले. साधारण दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत या श्वानांचा इतिहास सापडतो. अमेरिकेत हे पूर्णत: फ्रेंच बुल डॉग जातीचे श्वान तयार झाल्यावर तेथूनच १८९६ मध्ये जगभरात या श्वानांचा प्रसार झाला. भारतात या श्वानांचे ब्रीडिंग फार कमी प्रमाणात होत असले तरी घरात पाळण्यासाठी या श्वानांना प्रचंड मागणी आहे. चौदा ते पंधरा इंचाएवढीच उंची असल्याने कमी जागेतदेखील उत्तमरीत्या हे श्वान सांभाळता येऊ शकतात. विशेष म्हणजे बहुतेक घरांत श्वान पालनामध्ये हे श्वान दुर्मिळ असल्याने फ्रेंच बुल डॉग या श्वानांकडे खास पसंती दिसून येते.
आक्रमक रूप तरी खेळकर स्वभाव
मध्यम आकाराचे फ्रेंच बुल डॉग दिसायला आक्रमक भासतात. चपटा चेहरा आणि नाकामुळे या श्वानांना पाहताच क्षणी भीती निर्माण होते. असे असले तरी खेळकर स्वभावाचे फ्रेंच बुल डॉग जातीचे हे श्वान घरात पाळण्यासाठी उत्तम आहेत. लहान मुलांसोबतदेखील या जातीचे श्वान मिसळतात. कानाच्या आकारामुळे हे श्वान विशेष ओळखले जातात. वाघाच्या शरीरावर असतात, तसे काळे, पांढरे पट्टे या श्वानांच्या अंगावर आढळतात. दिसायला मध्यम आकाराचे असले तरी या श्वानांमध्ये तल्लख बुद्धिमत्ता दिसून येते.
स्वच्छ पाणी, सावली आणि थंड जागा
तीन देशांतील मिश्र ब्रीड या श्वानांमध्ये असल्याने भारतात या श्वानांचे पालन करताना काळजी घ्यावी लागते. या श्वानांना स्वच्छ पाणी, सावली आणि थंड जागेची आवश्यकता असते. पूर्ण थंड किंवा अति उष्ण अशा वातावरणात या श्वानांच्या जिवाला धोका संभवतो. कडक उन्हापासून या श्वानांना दूर ठेवणे गरजेचे असते. अवजड कामे या श्वानांना देऊ नयेत. खूप चालणे, डोंगर चढणे अशी कामे या श्वानांना दिल्यास त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होण्याची शक्यता असते. उन्हापासून रक्षण न केल्यास या श्वानांना काही त्वचेचे विकारही संभवतात.

व्यायामाची गरज
फ्रेंच बुल डॉग या जातीच्या श्वानांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उत्तम व्यायामाची गरज असते. दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे चालणे, मोकळ्या मैदानात धावणे असे व्यायाम होणे गरजेचे असते. सध्या या श्वानांना तयार डॉग फूड दिले जाते. मात्र खिमा, ब्रेड, दूध, अंडी असा आहार दिल्यास हे श्वान शारीरिकदृष्टय़ा अधिक सक्षम राहतात.