News Flash

मुशाफिरी : जिद्द आकाश कवेत घेण्याची

दहावीत प्रवेश घेणाऱ्या मानसीला रक्ताचा कर्करोग असल्याचे कळल्यानंतर तिची मानसिक अवस्था सैरभैर झाली.

| April 25, 2015 12:21 pm

दहावीत प्रवेश घेणाऱ्या मानसीला रक्ताचा कर्करोग असल्याचे कळल्यानंतर तिची मानसिक अवस्था सैरभैर झाली. पण त्यानंतरही तिने जिद्दीने कर्करोगावर मात केली. तिला झालेला त्रास, आलेला अनुभव आणि मानसिक अवस्था तिने शब्दबद्ध केल्या आहेत, ‘आकाश कवेत घेताना’ या पुस्तकातून..

मा नसी कुलकर्णी अर्थात आकाश कवेत घेणारी एक ठाणेकर तरुणी.. तिचे ‘आकाश कवेत घेताना’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. ‘रोटरी क्लब ऑफ, ठाणे’ यांच्या सौजन्याने अलीकडेच सहयोग मंदिर येथे मानसीची प्रकट मुलाखत घेण्यात आली. रोटेरियन मंदार जोशी यांनी ही मुलाखत घेतली. ‘जिद्द आकाश कवेत घेण्याची’ असा हा कार्यक्रम झाला. मानसीचा कर्करोगाशी सकारात्मक लढा व तिचे अनुभव या निमित्ताने ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारा आणणारे आणि तेवढेच एक सकरात्मकऊर्जा देणारे आहेत.
इयत्ता दहावीत प्रवेश करणाऱ्या मानसीला एक दिवस रक्ताचा कर्करोग आहे असे कळते, त्या वेळी तिची अवस्था काय झाली असेल याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. पण मानसीने आपले वैद्यकीय अहवाल स्वत: वाचले आणि तेवढय़ा ताकदीने तिने आपल्याच बाबतीत असलेले हे भंयकर आजारपणाचे सत्य पचवले. तिने हे सगळे अनुभव आपल्या पुस्तकात साध्या सहज भाषेत लिहिले आहेत. ते वाचताना आणि तिची मुलाखत ऐकताना एवढय़ाशा या जिवात एवढी सकारात्मक ऊर्जा कुठून आली, असा प्रश्न सतत पडत राहतो. ज्या दिवशी मानसीला कर्करोग असल्याचे निदान झाले, त्याच वेळी त्याच रुग्णालयामध्ये तिची आजी त्याच आजारावर उपचार घेत होती. हे ऐकले-वाचले की या कुटुंबावर केवढा मोठा दु:खाचा आणि वेदनेचा डोंगर कोसळला असेल हे आपल्या लक्षात येते. आज विज्ञान पुढे गेले आहे, कर्करोगावरही मात करता येते हे मान्य आहे. अनेक रुग्ण या आजारातून बरे होतात. या आजारात वैद्यकीय मदत, आप्तांची साथ आणि उपचार मिळावेच लागतात, पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचे हवी असती, ती रुग्णाची सकारात्मक मानसिकता. प्रचंड मोठय़ा ताकदीने रुग्णाला उभे रहावे लागते या आजारात.. तरच आणि तरच वैद्यकीय उपचारांना बळ येते. मानसीला हे बळ मिळाले. नियतीने मानसीला खेळण्या-बागडण्याच्या वयात हा प्रचंड आजार दिला आणि त्यासोबत तिला त्या आजाराशी लढण्याचे बळ आणि मानसिक ताकदही दिली. अत्यंत कठोर मेहनत घेणारे आणि धीट मनाचे आई-वडील दिले. म्हणूनच हा संघर्ष मानसीने जिंकला. अत्यंत नेटाने आणि हिमतीने तिने या आजारावर विजय मिळविला. हा सारा अनुभव तिने मुलाखतीत आणि पुस्तकातही कथन केला.
आज मानसी कर्करोगग्रस्तांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. तिचं हे पुस्तक अनेकांना या आजाराशी लढण्याचं बळ देईल. आपल्या वेदनेतून, दु:खातून सकरात्मक काही तरी वेचावे आणि दुसऱ्यांच्या नकारात्मक ऊर्जेवर मलम लावून त्यालाही जगण्याची नवी उमेद द्यावी, असे हे सारे काही आहे.
या आजारातील सारे त्रास तिने सहन केले. प्रचंड इच्छाशक्तीने तिने पुन्हा नव्या जगण्याचे आकाश कवेत घेतले. त्यामुळे तिचे अनुभव, पुस्तक किंवा तिच्याशी गप्पा मारणाऱ्याला, तिला भेटणाऱ्याला एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळेल यात शंका नाही.
प्राची

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2015 12:21 pm

Web Title: from the book of akash kavet ghetana
Next Stories
1 तिरका डोळा : सुटी म्हणजे पिंजऱ्यात बदल
2 तक्रारी वाढल्या.. तरीही फेरीवाले कायम!
3 नगरपालिकांत भूमिपुत्रांचीच चलती
Just Now!
X