ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये भाजीपाला आणि फळे खरेदीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी अखेर जिल्ह्यमधील महापालिका आणि नगर परिषद क्षेत्रातील भाजी मंडई, फळे आणि भाजीपाला दुकाने १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले. या आदेशानंतरही शहरांमधील भाजीपाला आणि फळांची दुकाने खुली दिसल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

टाळेबंदीच्या काळात भाजीपाला आणि किराणा दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांमध्ये खरेदी करताना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाला ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर या शहरांमधील नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. भाजीपाला आणि फळे खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये आणि भाजी मंडईत नागरिक मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत. यासाठी अखेर जिल्ह्यातील सर्व शहरांमधील भाजी मंडई तसेच फळे आणि भाजीपाला दुकाने १० एप्रिल रात्री १२ वाजेपासून मंगळवार, १४ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यतील महापालिका आणि नगर परिषद हद्दीतील सर्व भाजी मंडई, फळे आणि भाजीपाला दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

उल्लंघन केल्यास कारवाई

या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (ब) रोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिला आहे.