कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णांचा भार वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शंभर खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय उभारण्याचा विचार सुरू केला आहे. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांपैकी नेमक्या कोणत्या भागातील जागेवर हे रुग्णालय उभारायचे याबाबत अद्याप ठरविण्यात आलेले नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळाले तरच या रुग्णालयाच्या उभारणीचे काम हाती घ्यायचे, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून त्या ठिकाणी ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तिन्ही शहरातील रुग्णांसोबत जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णही उपचारांसाठी येत असतात. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कळवा रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णाचा भार वाढत आहे. ठाणे शहर, वागळे, घोडबंदर आणि मुंब्रा या भागातील रुग्णांसाठी कळवा रुग्णालयाचा प्रवास लांब आणि खर्चिक पडतो. यामुळे या भागातील रुग्णांना जवळच्या जवळ आरोग्यसेवा मिळावी म्हणून महापालिका प्रशासनाने विविध प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध भागात डायलेसीस केंद्र उभारणे आणि प्रसूतिगृहांमध्ये अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीआर वाडिया रुग्णालयात कर्करोग निदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. असे असतानाच महापालिकेने आता सुमारे शंभर खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय उभारण्याचा विचार सुरू केला आहे. उभारणीचा खर्च मोठा असल्यामुळ पालिकेला झेपणारे नाही.यामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळाले तरच या रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. त्यानंतरच ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांपैकी नेमक्या कोणत्या भागातील जागेवर हे रुग्णालय उभारायचे, याबाबत महापालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.