कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष भेट मिळण्याची शक्यता महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील भाजपच्या विकास परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटीच्या पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजमधील एक दमडी अद्याप पालिकेला मिळालेली नाही. या पाश्र्वभूमीवर महापौर देवळेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘लोकसत्ता ठाणे’ सहदैनिकाच्या बातमीच्या अनुषंगाने मंत्रालयात विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याची माहिती महापौरांनी दिली.

कल्याण-डोंबिवली पालिकेतील भाजप नगरसेवकांचे संख्याबळ नेहमी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला ‘टेकू’ देण्यापुरतेच मर्यादित राहिले. कल्याण-डोंबिवली पालिकेची ऑक्टोबर २०१५ मध्ये पालिका निवडणूक झाली. या वेळी मात्र राज्यातील भाजपची सत्ता, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले विकासाचे भरगच्च ६५०० हजार कोटींचे पॅकेज. त्यामुळे भाजपला भरभरून मते दिली तर विकासाची गंगा कल्याण-डोंबिवलीत येईल, असा विचार करून शहरवासीयांनी भाजप उमेदवारांना भरभरून मते देऊन भाजप नगरसेवकांची संख्या ३० ते ३५ इतकी वाढवली. पालिकेत संख्याबळात भाजप दुसऱ्या स्थानी आहे.

आता विकासाचे पॅकेज शहराला सुरू होईल, असे शहरवासीयांना वाटले होते. परंतु दोन वर्षांत पॅकेज नाहीच; पण कचऱ्याचे ढीग, दरुगधी, खड्डे, बेकायदा बांधकामांचा महापूर, पालिकेतील लाचखोरी, बेलगाम अधिकारी यांनी कळस गाठला आहे. पॅकेजचा पत्ताच नाही. त्यामुळे आता आपण फसलो गेल्याची शहरवासीयांची भावना झाली आहे. गेल्या ३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पॅकेजची घोषणा करून दोन वर्षे झाली. यासंबंधीचे ‘साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा खोटी’ असे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ सहदैनिकाने ३ ऑक्टोबर रोजी दिले होते.

३ ऑक्टोबर, मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर पालिकेच्या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले होते. त्या वेळी देवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना ‘लोकसत्ता ठाणे’ सहदैनिकातील पॅकेजच्या वृत्ताचा हवाला देऊन आपण केलेल्या पॅकेजच्या घोषणेचे काय झाले. याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’ सहदैनिकात मोठा वृत्तांत आला आहे, असे सांगितले. याबाबत आपण काही करणार की नाही, असा प्रश्न देवळेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला. त्या वेळी नेहमीच्या शैलीत गालावर हास्य आणून येत्या दोन आठवडय़ांत आपण याबाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री, महापौर यांना दिले.