ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवरील शिवशिल्प दुरुस्तीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना आणि मराठा मोर्चा पदाधिकारी यांच्यातील वाद टिपेला पोहचला असतानाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सकाळी शिवशिल्पाची पाहाणी करून त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच या कामासाठी २० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले.

प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम रखडल्याचा कांगावा महापालिकेतील ठरावीक पदाधिकाऱ्यांकडून केला जात असताना आयुक्तांनी याविषयी तातडीने निर्णय घेत सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.

ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवरील शिवशिल्पाची दुरवस्था झाली असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. तीन वर्षे उलटूनही मागणी मान्य होत नसल्यामुळे मराठा मोर्चाचे पदाधिकारी महापौर मिनाक्षी शिंदे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. या निवेदनासोबत शिवशिल्पाच्या दुरुस्तीसाठी धनादेश दिला जाणार होता. तसेच मराठा मोर्चा पदाधिकारी सोबत घेऊन आलेली चिल्लरही देणार असल्याची कुणकुण महापौर शिंदे यांना लागली होती. याच मुद्दय़ावरून त्यांच्यासह सभागृह नेते नरेश म्हस्के यांचा मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांसोबत वाद झाला. या वादानंतर मराठा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी शिवशिल्प दुरुस्तीसाठी दहा लाखांचा निधी देण्याचे आणि शनिवारपासून दुरुस्ती काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामासाठी रितसर निविदा काढून काम सुरू करण्याचा निर्णय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत घेतला होता. तसेच आयुक्त जयस्वाल यांनी शनिवारपासून काम सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी या कामासाठी निविदा काढावी लागणार असून या निविदा प्रक्रियेमुळे हे काम शनिवारपासून सुरू होणार नाही, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. असे असतानाच आयुक्त जयस्वाल यांनी शुक्रवारी सकाळी शिवशिल्पाची पाहणी करून त्याच्या दुरुस्तीसाठी पाच-दोन-दोन अंतर्गत २० लाखांचा निधी मंजूर केला. तसेच हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

दुरुस्ती अशी..

शिवशिल्पाच्या दुरुस्तीसाठी पाच-दोन-दोन अंतर्गत २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामध्ये शिल्पाची डागडुजी, रंगकाम, तुटलेले शिल्प बदलणे, विद्युत व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहे. शिवशिल्पावर पक्षी बसू नयेत यासाठी काच बसविणे आणि त्यासोबत उर्वरित इतर कामे नंतर करण्यात येतील.