18 January 2019

News Flash

अर्नाळा, राजोडी किनाऱ्यावरच अंत्यविधी

वसईतील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा किनारा म्हणजे अर्नाळा आणि राजोडी समुद्रकिनारा.

अर्नाळा समुद्रकिनारी उघडय़ावरच अंत्यसंस्कार करण्यात येतात. 

स्मशानभूमीची सोय असतानाही वापर नाही; पर्यटकांना त्रास

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींची सोय असतानाही अर्नाळा आणि राजोडी येथील समुद्रकिनाऱ्यावर उघडय़ावरच अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहे. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यासंबंधित साहित्य किनाऱ्यावर तसेच पडलेले असते. त्याचा त्रास पर्यटकांना होत आहे.

वसईतील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा किनारा म्हणजे अर्नाळा आणि राजोडी समुद्रकिनारा. त्यातच नुकताच पार पडलेल्या अर्नाळा महोत्सवात पर्यटनाविषयी मोठय़ा प्रमाणावर ब्रॅण्डिंग झाले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. परंतु या किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सोयीसुविधांचा अभाव आहे. त्याचबरोबर आता या किनाऱ्यावर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात येत आहे. अर्नाळा आणि राजोडी या किनाऱ्यांजवळच स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमींमध्ये योग्य त्या सोयीसुविधा असतानाही तिथे अंत्यसंस्कार न करता किनाऱ्यावरच अंत्यविधी केला जात आहे. अंत्यसंकारावेळी आणण्यात आलेली गादीही तशीच या ठिकाणी टाकून ग्रामस्थ जातात. त्याशिवाय मातीच्या मडक्याचे तुकडे आणि इतर वस्तू तशाच पडून असतात. मडक्याचे तुकडे नागरिकांच्या पायाला लागून दुखापत होण्याची शक्यता असते. मृतदेहाचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतच करण्यात यावे, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. किनाऱ्यावर उघडय़ावर अंत्यसंस्कार केल्यामुळे पर्यटकांची संख्या घटू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

येथे तीन नद्यांचा संगम होत असल्याने हे एक पवित्र ठिकाण आहे, म्हणून पूर्वीपासूनच या ठिकाणी किनाऱ्यावरच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र ग्रामपंचायतीने बांधलेल्या स्मशानभूमीचाही वापर ग्रामस्थांनी करावा.

महेंद्र पाटील, उपसरपंच, अर्नाळा

First Published on June 13, 2018 1:34 am

Web Title: funeral ceremony at arnala beach