28 October 2020

News Flash

मलंगगडावरील ‘फ्युनिक्युलर’ ट्रॉलीचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण

मलंगगड परिसरास शासनाने पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले आहे.

कल्याणपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडावर ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ बसविण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. मलंगगड डोंगराच्या उभ्या चढावावर ट्रॉली बसविण्याचे काम काहीसे आव्हानात्मक मानले जात होते. या कामात सातत्याने नैसर्गिक, तांत्रिक आणि मानवी अडथळे येत आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. येत्या डिसेंबपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.

मलंगगड परिसरास शासनाने पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागांतून अनेक भाविक, विविध जाती, धर्माचे नागरिक नियमित येत असतात. मलंगगडावर जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतराची उभी वळणाची पायवाट आहे. मलंगवाडी पायथ्यापासून गडावरील समाधी स्थळापर्यंत पोहचण्यासाठी पायी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. चढाव चढताना ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांची सर्वाधिक दमछाक होते. मलंगगड हे शासनाला महसूल मिळण्याचे आणि ग्रामस्थांना रोजगाराचे मोठे साधन आहे. त्यामुळे शासनाने काही वर्षांपूर्वी मलंगगड हे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविक, पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळायला हव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मलंगगडावर ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ (उभ्या चढावाने डोंगरावर धावणारी रेल्वे) बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला.

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित’ (बीओटी) करा या तत्त्वावर २००७ मध्ये मलंगगडावर ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ बसविण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये निविदा बोलीने मेसर्स सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले. ४५ कोटी ९१ लाखांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात शासनाच्या एक पैशाचाही निधी गुंतवणूक करण्यात आला नाही. कंपनीने दोन वर्षांत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. असे असताना पर्यावरण, वन विभाग व इतर परवानग्या मिळविताना कंपनीची सहा र्वष निघून गेली. केंद्र शासनाला १ कोटी ३० लाखांचा भरणा करण्यात आला. परवानग्या मिळाल्यानंतर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. डिसेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण होणे आवश्यक होते. नैसर्गिक, तांत्रिक अडचणींबरोबर आर्थिक चणचणीमुळे काम पूर्ण होण्यात थोडे अडथळे आले आहेत. याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता राजेश सोमवंशी यांनी दिली.

काम पूर्णत्वाच्या मार्गावर

‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ बसविण्यासाठी पायथ्यापासून ते गडाच्या माथ्यापर्यंत एकूण १०० सीमेंटचे खांब प्रस्तावित आहेत. यामधील ८५ खांब बांधून पूर्ण आहेत. १० कॉलम डोंगराच्या दरीच्या ठिकाणी उभे करायचे आहेत. तेथे यंत्रणा नाहीच, पण कामगारही जाऊ शकत नाही. या घळीच्या ठिकाणी पर्यायी यंत्रणेद्वारे हळूहळू खडक फोडण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. वाढलेल्या खर्चातील एक पैसा वाढवून देण्यात शासन तयार नाही. त्यामुळे आहे त्या निधीत उपलब्ध काम पूर्ण करायचे आहे. देशातील हा पहिला आदर्शवत प्रकल्प असल्याने ते पूर्ण करण्याचे आव्हान कंपनीने स्वीकारले आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे मे. फ्युनिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनीचे महाव्यवस्थापक झहिर शेख यांनी सांगितले.

फ्युनिक्युलर मार्गावर सहा बोगी धावणार आहेत. त्यामधील चार बोगी तयार आहेत. प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून विविध कारणांनी देण्यात येणारा उपद्रव आणि निधीची कमतरता हे प्रकल्प रखडण्यामागील कारण आहे. तरीही वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

-राजेश सोमवंशी, उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:39 am

Web Title: funicular trolley at malang fort work
Next Stories
1 ऑन दि स्पॉट
2 इन फोकस : ऊन मी म्हणतंय..!
3 शाळेच्या बाकावरून : सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासाचे ध्येय..!
Just Now!
X