वारंवार दुरुस्ती करण्याऐवजी नवी इमारत बांधण्याची मागणी

ठाणे : ठाणे शहरातील नाटयप्रेमी आणि कलाकारांचे हक्काचे ठिकाण असलेल्या गडकरी रंगायतन या नाटय़गृहाची इमारत अतिधोकादायक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या इमारतीची तात्पुरती डागडुजी करून नाटय़गृह पुन्हा सुरू केले आहे. मात्र, तात्पुरती डागडुजी करण्यामुळे नाटय़गृहामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या जीवाला धोका कायम असून त्या ठिकाणी नाटय़गृहासाठी नवी इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली राम गणेश गडकरी रंगायतनची इमारत उभारून २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. ही इमारत धोकादायक झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्चून या इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती केली आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात दोन वेळा झालेल्या संरचनात्मकपरीक्षणात गडकरी रंगायतनची इमारत अतिधोकादायक झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करून नाटय़गृह प्रेक्षकांसाठी खुले केले. असे असले तरी ही डागडुजी तात्पुरती असून या अतिधोकादायक इमारतीमध्ये प्रयोग सुरू असताना एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण अशी, अशा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे या इमारतींच्या जागी नवी इमारत उभारण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे.